Maharashtra CM: बाजारात अनेक आमदार आहेत, भाजपा १६५ चा आकडा पार करेल - नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 07:50 AM2019-11-24T07:50:05+5:302019-11-26T17:03:40+5:30
Maharashtra News: भाजपा सरकार बनविणार असं मी आठवडाभरापूर्वी सांगितलं होतं
मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या नाट्यात अजित पवारांनी केलेलं बंड महाविकासआघाडीच्या सरकार स्थापनेला सुरुंग लावणारं ठरलं आहे. शुक्रवारी रात्री घडलेल्या घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी भाजपाशी हातमिळवणी करत थेट उपमुख्यंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादीचे १०-११ आमदार उपस्थित होते. यातील काही आमदार पुन्हा राष्ट्रवादी पक्षात आले असल्याचं दिसून आलं. मात्र फसवून शपथविधीला जायला ते आमदार लहान आहेत का? बाजारात अनेक आमदार आहेत त्यामुळे एक, दोन आमदार परत गेल्याने फरक पडणार नाही असं भाजपा खासदार नारायण राणे यांनी सांगितलं आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना नारायण राणे म्हणाले की, बाजारात अनेक आमदार आहेत, काही येणार आहेत काही सीमेवर आहेत. महाराष्ट्रात जे काही घडलं तो भूकंप नसून ही गोष्ट घडणार होती. भाजपा सरकार बनविणार असं मी आठवडाभरापूर्वी सांगितलं होतं. हे सरकार ५ वर्ष टिकेल, देवेंद्र फडणवीस, अजित पवार दोघंही अनुभवी नेते, याचा फायदा भाजपाला अन् जनतेला होईल असं त्यांनी सांगितले.
तसेच आजही शिवसेना, काँग्रेसचे आमदार संपर्कात आहेत. फक्त अजित पवार नव्हे तर काही आमदारांना शिवसेनेत, काँग्रेस पक्षात राहायचं नाही. संजय राऊतांकडून जी भाषा बोलली जाते ते महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात शोभणारी नाही, भाजपावर जे आरोप केले जातायेत त्याला लवकरच उत्तर देणार आहे. ५६ आमदारांच्या बळावर मुख्यमंत्री होईल हे बोलणं चुकीचं आहे. भाजपा विश्वासदर्शक ठराव जिंकेल असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, ३० नोव्हेंबरला किती आमदार भाजपासोबत असतील ते दिसून येईल. आम्हाला बहुमत सिद्ध करण्यासाठी जो आकडा आहे तो दिसेल, त्यावेळी ताकद दाखवू, भाजपा १६५ आमदारांच्या वर जाईल असं चित्र आहे. अजित पवारांसारखा नेता निर्णय घेतो तेव्हा तो ठाम असतो, ते निर्णयावर ठाम राहतील असंही नारायण राणेंनी स्पष्ट केलं आहे.
अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शनिवारी सायंकाळी वाय.बी. चव्हाण सेंटर येथे बैठक झाली. राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत. पैकी ४२ आमदार या बैठकीला हजर होते आणि सहा आमदार येत आहेत. अजित पवारांसोबत गेलेल्या ११ आमदारांपैकी पाच जणांशी संपर्क होऊ शकला नाही, असे नवाब मलिक यांनी सांगितले.