देशातील जनतेला फसवण्याचं काम मोदी सरकार करतेय; भाई जगताप यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 02:36 PM2022-06-13T14:36:22+5:302022-06-13T14:36:29+5:30
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी आज ईडीसमोर हजर झाले.
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःचं अपयश लपवण्यासाठी ईडीला पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा निषेध म्हणून काँग्रेसने देशभरात आंदोलन सुरू केलंय, असं काँग्रेसचे नेते भाई जगताप म्हणाले.
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी आज ईडीसमोर हजर झाले. राहुल गांधी हे गेल्या काही दिवसांपासून परदेशात होते. यामुळे त्यांनी ईडीकडे चौकशीची वेळ पुढे ढकलावी, अशी मागणी केली होती. राहुल गांधी यांच्यावरील ईडीच्या कारवाईचा निषेध म्हणून काँग्रेसकडून दिल्लीसह महाराष्टात देखील आंदोलन करण्यात येत आहे.
राहुल गांधी यांच्यावरील कारवाईचा निषेध म्हणून काँग्रेसने भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखाली मुंबई, येथील ईडी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष श्री. नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख तसेच काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते, आजी माजी आमदार, खासदार व नगरसेवक आणि पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.
.@INCMumbai President Shri @BhaiJagtap1 has been detained by the police for protesting against the BJP govt's misuse of state machinery like the ED for its vendetta politics. #IndiaWithRahulGandhipic.twitter.com/aszc95fuIQ
— Congress (@INCIndia) June 13, 2022
दरम्यान, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात एका पैशाचाही गैरव्यवहार झालेला नाही. एकाही संचालकाला लाभांश अथवा पैसे मिळालेले नाहीत. २०१५ साली बंद झालेले हे प्रकरण फक्त गांधी कुटुंबाला त्रास देण्यासाठी उकरून काढण्यात आले आहे. केंद्र सरकारने राजकीय द्वेष भावनेतून सोनिया आणि राहुल गांधी यांना ईडीच्या नोटिसा पाठविल्या आहेत, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.