राहुल गांधींच्या दोन वर्षाच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मुंबई काँग्रेसने केला जल्लोष
By मनोहर कुंभेजकर | Published: August 4, 2023 07:26 PM2023-08-04T19:26:27+5:302023-08-04T19:27:52+5:30
वर्षा गायकवाड यांना पेढा भरवून आणि ढोल व फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.
मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरात हायकोर्टाने ठोठावलेल्या २ वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. या निर्णयाने संपूर्ण देशभरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. संपूर्ण देशभर जल्लोष केला जात आहे. मुंबईमध्ये देखील मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेस कार्यालयासमोर जल्लोष साजरा केला. मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांना पेढा भरवून आणि ढोल व फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.
या वेळेस बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आजचा दिवस हा संपूर्ण देशातील काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी आणि काँग्रेसच्या विचारधारेला मानणाऱ्या लोकांसाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे. राहुल गांधी यांना गुजरात हायकोर्टाने ठोठावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली, हा तर सत्याचा विजय आहे. सत्य परेशान हो सकता है, सत्य पराजित नही हो सकता, हेच या निर्णयातून सिद्ध झाले आहे. या निर्णयामुळे त्यांची खासदारकी पुन्हा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून ते पुन्हा एकदा खासदार म्हणून संसदेत जातील आणि जनतेच्या प्रश्नांना घेऊन केंद्रातील मोदी सरकारला जाब विचारतील, याची आम्हाला प्रतीक्षा आहे.
या जल्लोशोत्सवात मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष मधू चव्हाण, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अनिशा बागुल, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस महेंद्र मुणगेकर आणि संदीप शुक्ला, सचिव कचरू यादव, जिल्हाध्यक्ष प्रमोद मांद्रेकर व क्लाइव्ह डायस, मुंबई काँग्रेसचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.