राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्ष करण्यासाठी मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी करा; नाना पटोलेंचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 08:11 PM2021-11-01T20:11:24+5:302021-11-01T20:12:31+5:30
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन दादर येथे काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
मुंबई:काँग्रेस विचारांना मानणारा मोठा वर्ग राज्यात असून काँग्रेसला नेहमी त्यांनी साथ दिली आहे. काँग्रेस पक्षाचे संघटन आणखी मजबूत करण्यासाठी सदस्य नोंदणी करणे गरजेचे असून गावा गावात जाऊन काँग्रेचे सदस्य नोंदणी करा व पक्षाची ताकद वाढवा. भाजप (BJP) आणि नरेंद्र मोदी यांना (Narendra Modi) फक्त राहुल गांधी (Rahul Gandhi) हेच पर्याय आहेत. भाजपचा पराभव फक्त काँग्रेसच करू शकते. त्यामुळे राहुलजी गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष करण्यासाठी मोठ्या संख्येने सदस्यनोंदणी करून काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करा असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन दादर येथे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या हस्ते काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. मुंबईसोबत राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते गडचिरोली येथे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यात, कोल्हापुरात गृहराज्यमंत्री सतेज बंटी पाटील यांच्या हस्ते तर अमरावती येथे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या हस्ते सदस्य नोंदणीचा शुभारंभ झाला.
राहुल गांधींचा २८ डिसेंबर रोजी शिवाजी पार्कात मेळावा
काँग्रेस पक्षाची स्थापना मुंबईत शहरात झाली. मुंबई व महाराष्ट्राने काँग्रेस पक्ष, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना ताकद दिली आहे. ०१ नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या काँग्रेस सदस्य नोंदणीतही जास्तीत जास्त सदस्य नोंदवून मुंबई आणि महाराष्ट्राने संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणाच्या मोहिमेत मोठ्या संख्येने नागरिकांना सहभागी करून घ्यावे. मुंबईच्या ऐतिहासिक आणि पवित्र महानगरात काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. मुंबई काँग्रेस विचारांचे शहर आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार देशभर १ नोव्हेंबरपासून काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाली आहे. मुंबई काँग्रेस १० लाख सदस्यांची नोंदणी करणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करावी. आपले नेते राहुल गांधी २८ डिसेंबर रोजी शिवाजी पार्क येथे आयोजित मेळाव्याला संबोधित करणार आहेत त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीचा आढावा त्यांच्यासमोर मांडा, असे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.