अजित पवारांना मुंबईत मिळाला मोठा चेहरा; बाबा सिद्दिकींनी काँग्रेस का सोडली?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 03:33 PM2024-02-08T15:33:08+5:302024-02-08T15:34:19+5:30
जर कुणी माझ्याबाबतीत काही बोलले तर मी जशास तसं उत्तर देईन असा इशारा बाबा सिद्दिकी यांनी दिला.
मुंबई - Baba Siddique on NCP ( Marathi News ) काँग्रेस सोडताना दु:ख होतंय, परंतु काही गोष्टी न सांगण्यासारखे आहेत. परंतु महाराष्ट्रासह मुंबईतले बरेच काँग्रेस नेते, पदाधिकारी लवकरच पक्षाबाहेर पडतील. १० तारखेला माझा अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होईल.
बाबा सिद्दिकी म्हणाले की, आम्ही काँग्रेस कुटुंबात इतकी वर्ष राहिलो. त्यात अनेकदा विषय मांडत होतो. काहीतरी झाल्याशिवाय कुणी बाहेर पडत नाही. त्यामुळे मी बाहेर पडलो. झिशान सिद्दिकी हा त्याचा निर्णय स्वत: घेईल. माझ्यासोबत बरेच पदाधिकारी, सहकारी पक्षात प्रवेश करतील. यात जिल्हा परिषदेचे सदस्य, काही नगरसेवक तेदेखील काँग्रेस सोडून माझ्यासोबत येतील. आम्ही ज्या पक्षात जाणार आहोत त्याची ताकद वाढवू असं त्यांनी सांगितले.
तसेच मी अजित पवारांचे नेहमी कौतुक केले आहे. मी मंत्री असताना त्यांचे काम पाहिले आहे. लोकांच्या कामासाठी अजित पवार सातत्याने सक्रीय असतात. येणाऱ्या काळात तुम्हाला सर्वकाही दिसेल. माझा संबंध गांधी कुटुंबाशी जवळ होता. परंतु काही गोष्टी अशा घडतात त्यात वैयक्तिक संबंध असले तरी थोडंफार विचार करावा लागतो. मी अचानक हा निर्णय घेतला नाही. मी माझ्या वरिष्ठांना १५ दिवसांपूर्वी पक्ष सोडणार हे सांगितले आहे. काहीतरी घडतंय त्यामुळे नाईलाजास्तव मला पक्षातून बाहेर पडावे लागतंय. जर कुणी माझ्याबाबतीत काही बोलले तर मी जशास तसं उत्तर देईन असा इशारा बाबा सिद्दिकी यांनी दिला.
दरम्यान, मला राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यसभेची ऑफर दिली नाही. माझ्यावर जी जबाबदारी दिली जाईल ती मी पूर्ण करेन. मी काँग्रेसमध्ये ४८ वर्ष काम केलीय. युवक काँग्रेसपासून सर्व पातळीवर काम केलंय. केवळ मुंबईतच नव्हे महाराष्ट्र आणि देशातील काही भागातही मी काम केले आहे. काही निर्णय दु:खद असले तरी घ्यावेच लागतात महाविकास आघाडी सरकारचा कार्यकाळ आपण पाहिलाय, मी पुढच्या भाषणात सर्वकाही बोलेन असं बाबा सिद्दिकी म्हणाले.
अजित पवारांना मिळाला मोठा मुस्लीम चेहरा
अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगळी भूमिका घेतल्यानंतर बहुतांश आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला. त्यात सध्या ईडीच्या कोठडीत असलेल्या नवाब मलिकांनीही अजित पवारांची भेट घेतली होती. मात्र नवाब मलिक यांच्या अजित पवार गटाच्या भेटीगाठी आणि संभाव्य प्रवेशाची चर्चा होत असतानाच भाजपाने त्यास विरोध केला. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मलिकांपासून अजित पवार गट दूर झाला. त्यात मुंबईत बाबा सिद्दिकी यांच्यासारखा मोठा मुस्लीम चेहरा अजित पवारांसोबत जात असल्याने मुंबईत राष्ट्रवादीला फायदा होण्याची शक्यता आहे.