सावरकरांना 'वीर' म्हणण्यासही आक्षेप, काँग्रेस नेत्यानं दिलं भगतसिंगांचं उदाहरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 01:12 PM2022-11-18T13:12:37+5:302022-11-18T13:13:28+5:30
राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री अॅड. नितीन राऊत यांनी सावरकरांना वीर म्हणण्यास आक्षेप घेतला आहे.
मुंबई - काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरुन चांगलाच वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेनं राहुल गांधींच्या विधानाचं कुठलंही समर्थन केलं नसून ते विधान चुकीचंच आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यासोबतच, संजय राऊत यांनीही राहुल गांधींचं ते विधान महाविकास आघाडीला धोका पोहोचवणारं असल्याचं म्हटलं आहे. तर, काँग्रेसच्या काही नेत्यांनाही ते विधान रुचलं नसल्याचं ते म्हणाले. मात्र, काँग्रेसचे वरिष्ठ नेते अॅड. नितीन राऊत यांनी ट्विट करुन पुन्हा एकदा सावरकरांवर निशाणा साधला आहे.
राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री अॅड. नितीन राऊत यांनी सावरकरांना वीर म्हणण्यास आक्षेप घेतला आहे. तसेच, सावरकरांची तुलना करताना त्यांनी शहीद भगतसिंगांचं उदाहरण दिलं आहे. ''भारतात एकमेव व्यक्ती आहे, ज्याच्या नावापुढे 'वीर' लिहिण्यात आलं आहे, जे त्यांच्या आयुष्याची साधर्म वाटत नाही. 6 वेळा माफीनामा लिहिला. इंग्रजांकडून पेन्शनही घेतली. एवढं सगळं असूनही त्यांचे समर्थक त्यांना 'वीर' म्हणतात. विचार करा, सावरकरांचं हेच काम भगत सिंग यांनी केलं असतं, तर ते वीर असते? असा प्रश्न नितीन राऊत यांनी विचारला आहे.
भारत में एकमात्र व्यक्ति जिसके आगे लिखा 'वीर' उसकी लाइफ से मैच नहीं करता। 6 बार माफीनामा लिखा। अंग्रेजो से पेंशन ली। इतना कुछ होते हुए भी उसके समर्थक वीर बताते हैं।
— Dr. Nitin Raut 🇮🇳 (@NitinRaut_INC) November 18, 2022
सोचिए, सावरकर वाला यही काम भगत सिंह ने किया होता तो क्या वह वीर होते?
काय म्हणाले संजय राऊत
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा काढण्याचं काहीच कारण नव्हतं. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असं नाही. तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे. राहुल गांधी यांनी अशा प्रकारचं विधान करण्याची काहीच गरज नव्हती. यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते हे लक्षात घ्या, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सावरकरांबाबतच्या राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे मविआमध्ये धुसफूस असल्याचं म्हटलं जात आहे. त्यात संजय राऊत यांनीही सूचक विधान करत काँग्रेसला सूचक इशारा दिला आहे.