खातेवाटपाचा तिढा अखेर सुटला; राष्ट्रवादीकडे गृह, शिवसेनेकडे नगरविकास खाते
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 04:23 AM2019-12-12T04:23:56+5:302019-12-12T06:21:17+5:30
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन पंधरा दिवस झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप रखडले होते.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यातील बंदद्वार चर्चेनंतर महाविकास आघाडीच्या खाते वाटपाचा तिढा सुटला असून गृह खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर नगरविकास खाते शिवसेनेकडे राहाणार आहे. खाते वाटपाची अधिकृत घोषणा आज (गुरुवारी) होण्याची शक्यता आहे.
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन पंधरा दिवस झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप रखडले होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शपथविधी झालेले सहा मंत्री आजवर बिनखात्याचे आहेत. गृह, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खात्यावरून खाते वाटप रखडले होते. गृह खात्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीने दावा सांगितला होता. सा. बांधकाम खात्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू होती. मात्र, बुधवारी मुख्यमंत्री ठाकरे आणि अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेअंती खाते वाटपावर सहमती झाली.
मंत्रिमंडळाचा विस्तार होईपर्यंत गृहखाते मुख्यमंत्र्याकडेच राहाणार आहे. काँग्रेसच्या वाट्याला ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रीपदे आली आहेत. मात्र, कोणाचा मंत्रिमंडळात समावेश करायचा याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे दिल्लीशी बोलून घेणार आहेत.
संभाव्य खातेवाटप
काँग्रेस : महसूल, ऊर्जा, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम, दुग्धविकास व पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, वस्त्रोद्योग, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण. तसेच (राज्यमंत्री) सहकार, नगरविकास, गृह (ग्रामीण)
राष्ट्रवादी : गृह, सहकार, वित्त, ग्रामविकास, पणन, सामाजिक न्याय, गृहनिर्माण, कृषी, सार्वजनिक आरोग्य. जलसंपदा, अल्पसंख्यांक
शिवसेना : नगरविकास, उद्योग, उच्च व तंत्रशिक्षण, परिवहन, एमएसआरडीसी, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, वन, पर्यावरण, सांस्कृतिक कार्य, पाणीपुरवठा, अन्न व औषधी पुरवठा, पर्यटन