काँग्रेस आमदाराचं उघड बंड, अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत सहभागी; लवकरच पक्षप्रवेश?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 02:11 PM2024-08-19T14:11:02+5:302024-08-19T14:13:29+5:30

काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचं वांद्रे पूर्व मतदारसंघात जंगी स्वागत केले. 

Open Rebellion of Congress MLA Zeeshan Siddique, Participant in Ajit Pawar NCP Jansanman Yatra; Joining the party soon? | काँग्रेस आमदाराचं उघड बंड, अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत सहभागी; लवकरच पक्षप्रवेश?

काँग्रेस आमदाराचं उघड बंड, अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत सहभागी; लवकरच पक्षप्रवेश?

मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज मुंबईत पोहचली आहे. या यात्रेत काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी उघडपणे अजित पवारांसोबत सहभागी झाले आहेत. झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी काही महिन्यांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तेव्हापासून झिशान सिद्दीकी राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा होती.

झिशान सिद्दीकी यांनी अद्याप काँग्रेसचा राजीनामा दिला नाही मात्र ते उघडपणे अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत सहभागी होत आहेत त्यामुळे लवकरच ते राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहेत. वांद्रे ते अणुशक्तीनगर या भागातून अजित पवारांची जनसन्मान यात्रा काढण्यात येत आहे. या मतदारसंघात झिशान सिद्दीकी यांनी अजित पवारांच्या स्वागतासाठी मोठमोठे बॅनर्स लावले आहेत. अणुशक्तीनगरमध्ये नवाब मलिकांनीही अजितदादांच्या स्वागताचे बॅनर्स लावले आहेत. 

काय म्हणाले झिशान सिद्दीकी?

वांद्रे पूर्व मतदारसंघात १५ हजाराहून अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला आहे. याच महिन्यात त्यांना ३ हजार मिळाले आहेत. त्यासाठीच आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धन्यवाद देण्यासाठी वांद्रे पूर्व येथील जनता रस्त्यावर उतरत आहे. अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. ते महायुतीचे असले म्हणून काय झाले. जे चांगले काम करतात त्यांचे कौतुक व्हायला हवं. मी सध्या काँग्रेससोबत आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघात काही दिवसांपासून न्याय यात्रा वर्षा गायकवाडांनी काढली होती त्यात मला बोलावण्यात आले नाही. काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज मागवले जात आहेत. मी माझा प्रतिनिधी पाठवला मात्र त्याला अर्ज देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे काँग्रेसचा निर्णय समजला, आता आम्हाला निर्णय घ्यायचा आहे. आमच्यासाठी जनता निर्णय घेईल. काँग्रेस नेतृत्व जर त्यांच्या पक्षातील आमदारांसोबत उभं राहत असतं तर त्यांना इतर नेतृत्वाकडे जाण्याची वेळ आली नसती अशी नाराजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी बोलून दाखवली. 

दरम्यान, आम्ही सर्व महाराष्ट्रात लक्ष केंद्रीत केले आहे. जनसन्मान यात्रा ऐतिहासिक आहे. त्याला महिला भगिनींचा उदंड प्रतिसाद मिळतोय. मुंबईत अजित पवारांचे स्वागत जबरदस्त आहे. झिशान सिद्दीकीबाबत योग्य वेळी निर्णय होईल. विधानसभेला आम्हाला ४७ आमदारांपेक्षा जास्त यश मिळेल. अजून बरेच आमदार आमच्या संपर्कात आहेत असं विधान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलं आहे. 
 

Web Title: Open Rebellion of Congress MLA Zeeshan Siddique, Participant in Ajit Pawar NCP Jansanman Yatra; Joining the party soon?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.