काँग्रेस-शिवसेनेत सर्वकाही ठीक?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींची फोनवरुन चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 01:27 PM2020-05-27T13:27:48+5:302020-05-27T13:30:41+5:30
माहितीनुसार, बुधवारी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात फोनवरुन संवाद झाला.
मुंबई – राज्यात सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडींमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांची वर्षावर बैठक बोलावली आहे. तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी फोनवरुन संवाद साधल्याची माहिती आहे. यावेळी राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंना कोरोना संकटकाळात काँग्रेस महाविकास आघाडीसोबतच आहे असं आश्वासन दिलं आहे.
मंगळवारी राहुल गांधी यांनी एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना महाराष्ट्र सरकारला आमचा पाठिंबा आहे पण आम्ही डिसिजन मेकर नाही असं विधान केलं होतं. या विधानानंतर राज्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र निर्माण झालं. विरोधी पक्षानेही राज्य सरकारवर आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा लावला.
माहितीनुसार, बुधवारी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात फोनवरुन संवाद झाला. या संवादातून काँग्रेस सरकारसोबत आहे असं राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंना आश्वासन दिलं. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या घटकपक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोना संकट आणि बाबींवर चर्चा होणार आहे.
राज्यात महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल आहे असं चित्र दिसत नाही, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. ज्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली त्याचदिवशी शरद पवार मातोश्रीला जाऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या भेटीत कोरोनावर चर्चा झाल्याचं संजय राऊत सांगत असले तरी राज्य सरकारला स्थिर असल्याचं वारंवार बोलत आहे.
बुधवारच्या सामना संपादकीयमध्ये सांगितलं आहे की, शरद पवार आणि संजय राऊत यांनी राज्यपालांची भेट घेऊन कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. शरद पवारांनी अनेकदा मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. या बैठका नियमित स्वरुपात सुरु असतात. भाजपाने महाराष्ट्रऐवजी गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी, उद्धव ठाकरे सरकार ११ दिवस चालणार नाही असं म्हणाले आज जवळपास ६ महिने ठाकरे सरकारला पूर्ण झालेत असा टोला त्यांनी भाजपाला लगावला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार मजबूत असल्याची ग्वाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेने दिली तर हे सरकार अंतर्विरोधाने पडेल, असे भाकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वर्तविले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात काँग्रेसला निर्णयाचा अधिकार नसल्याची खंत व्यक्त केली, पण सरकारमधून बाहेर पडणार नसल्याचे स्पष्ट केले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
…तर भारताच्या ‘चक्रव्युहातून’ बाहेर पडणं कठीण; सीमेवरील डावपेच चीनला महागात पडणार
चीनविरुद्ध भारताचं ‘पंच’तंत्र सज्ज; लडाख सीमेवर ड्रगनला चोख उत्तर देण्यास लष्कराची तयारी
बोटांच्या लांबीने कळेल तुम्हाला कोरोनामुळे मृत्यूचा धोका किती?; वैज्ञानिकांनी सांगितलं...
कोरोनाशी लढण्यासाठी वैज्ञानिकांचा नवा शोध; ‘या’ औषधाचा एक डोस रुग्णांना देणार ताकद!