राहुल गांधी यांनी धारावीत घेतली चर्मोद्योगाची माहिती; स्वत: केली पर्सची शिलाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 10:51 IST2025-03-07T10:49:29+5:302025-03-07T10:51:00+5:30
धारावीतील झोपडपट्टीत मोठ्या ब्रँडच्या वस्तू तयार होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

राहुल गांधी यांनी धारावीत घेतली चर्मोद्योगाची माहिती; स्वत: केली पर्सची शिलाई
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी गुरूवारी मुंबईत आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी धारावीला भेट दिली. यावेळी त्यांनी कोणतीही राजकीय चर्चा अथवा टीकाटिप्पणी न करता केवळ धारावीतील चर्मोद्योगाची माहिती घेऊन हा उद्योग जागतिक स्तरावर अधिक मोठ्या प्रमाणात कसा नेता येईल, याबद्दल चर्चा केल्याची माहिती स्थानिक उद्योजकांनी दिली.
परदेशात एका ठिकाणी ‘चमार’ या ब्रँडची वस्तू पाहायला मिळाल्यानंतर कुतूहल जागे झालेल्या राहुल यांनी या वस्तूच्या उत्पादनाबाबत चौकशी केली असता ती मुंबईतील धारावी येथे तयार झाल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी धारावीतील हा छोटा उद्योग पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. या उद्योगासाठी कशा पद्धतीने मदत करता येईल आणि भारताबाहेर या वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणावर कशी वाढेल, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे स्थानिक उद्योजक सुधीर राजभर यांनी सांगितले.
स्वत: केली पर्सची शिलाई
धारावीतील छोट्याशा गल्लीतील कारखान्यात राहुल यांनी सस्टेनेबल मटेरियलपासून बनवण्यात आलेल्या एका पर्सला स्वतः शिलाई मारली. धारावीतील झोपडपट्टीत मोठ्या ब्रँडच्या वस्तू तयार होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.