राहुल गांधी निवडणुकांचे रणशिंग फुंकणार, धुळे अन् मुंबईत आज सभा होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 08:10 AM2019-03-01T08:10:29+5:302019-03-01T08:10:37+5:30
धुळे येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या मैदानावर दुपारी १ वाजता होणार आहे
मुंबई : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी १ मार्च रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून धुळे आणि मुंबई येथे त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने या सभेला महत्व आहे. त्यामुळे या सभेतूनच महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाईल, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी निश्चित झाली असून बहुजन वंचित आघाडीलाही सोबत घेण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत.
धुळे येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या मैदानावर दुपारी १ वाजता होणार आहे. त्यानंतर ते मुंबईला येणार असून, येथील वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर सायंकाळी ५ वाजता जाहीर सभा होणार आहे. या दोन्ही सभांची जय्यत तयारी करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी शहरात सर्वत्र कॉँग्रेसचे झेंडे लावले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे दिग्गज नेत या सभांच्या आयोजनात व्यस्त असून येणाऱ्या निवडणुकांची रणनिती या सभांनंतर राहुल गांधींशी भेटून ठरविण्यात येणार असल्याचं समजते.