'उपऱ्या निरुपमांकडून काँग्रेसच्या निष्ठावंतांना डावलण्याचा प्रयत्न'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 02:36 PM2018-06-12T14:36:32+5:302018-06-12T14:36:32+5:30
मुंबई काँग्रेसच्या अनुसूचित विभागाच्या माजी अध्यक्षांची टीका; राहुल गांधींच्या दौऱ्यात मुंबई काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर
मुंबई: काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर आले असताना पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. शिवसेनेतून आलेले उपरे संजय निरुपम काँग्रेसच्या निष्ठावंतांवर अन्याय करत असल्याची टीका मुंबई काँग्रेसच्या अनुसूचित विभागाचे माजी अध्यक्ष गणेश कांबळे यांनी केली. राहुल गांधींच्या कार्यक्रमाचा पास आपल्याला देण्यात आला नाही, असंही त्यांनी म्हटलं. निरुपम यांच्याकडून काँग्रेसमधील जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांची गळचेपी केली जात असल्याचा आरोप कांबळे यांनी केला.
राहुल गांधी थोड्याच वेळात गोरेगावात काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. मात्र या कार्यक्रमासाठी अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आलेलं नाही, अशी माहिती गणेश कांबळेंनी 'लोकमत'शी बोलताना दिली. 'राहुल गांधींचा कार्यक्रम माझ्या मतदारसंघात होत आहे. मात्र या कार्यक्रमासाठीचा पास मला देण्यात आलेला नाही', असं कांबळेंनी म्हटलं. 'गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबईतून 5 लाख मतांनी पराभूत झालेल्या निरुपम यांना पुढील वर्षी उत्तर पश्चिम मतदारसंघातून लोकसभा लढवायची. त्यामुळे या कार्यक्रमासाठी त्यांनी माजी खासदार गुरुदास कामत यांनाही डावललं. स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी निरुपम मनाला वाट्टेल ते करत आहेत,' असा आरोप कांबळेंनी केला.
राहुल गांधींनी संजय निरुपम यांच्या मनमानीला लगाम घालावा, अशी विनंती कांबळे यांनी केली. 'एकीकडे राहुल गांधी दलितांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांच्या बाजूनं उभे राहत आहेत. तर संजय निरुपम दलित नेते आणि कार्यकर्त्यांना बाजूला सारत आहेत. काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीच्या विरोधातील कृती निरुपम यांच्याकडून सुरू आहे. राहुल गांधींनी या सर्व प्रकाराची गंभीर दखल घ्यावी,' असं आवाहनदेखील त्यांनी केलं.
संजय निरुपम भाजपा आणि शिवसेनेला अनुकूल तिकीट वाटप करुन काँग्रेसचं नुकसान करत आल्याचा गंभीर आरोपदेखील कांबळे यांनी केला. 'गेल्या वर्षी झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत निरुपम यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसचं मोठं नुकसान झालं. 52 जागांवर निवडून येणारा पक्ष 31 जागांवर आला. भाजपा आणि शिवसेनेला अनुकूल तिकीट वाटप करुन पक्षाला कमजोर करण्याचं काम निरुपम यांनी केलं आहे,' असं कांबळे म्हणाले.