'सावरकरांवर टीका करणारे राहुल गांधींच भगोडे बनले'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 08:35 AM2019-07-05T08:35:12+5:302019-07-05T08:35:49+5:30
देशाच्या सर्व संस्थांवर ‘संघा’चा कब्जा करण्याचे स्वप्न साकार झाल्याची वेदना राहुल गांधी यांनी व्यक्त केली. आयएसआयचा कब्जा असण्यापेक्षा संघाचा कब्जा असणे कधीही चांगले आहे.
मुंबई - प्रचाराच्या काळात राहुल गांधी यांनी मंदिरांचे उंबरठे झिजवले, पण वीर सावरकरांचा अपमान करून त्यांनी देवदर्शनावर पाणी ओतले. सावरकर हे हिंदुत्व, राष्ट्रभक्तांचे देव आहेत. सावरकरांना हे महाशय ‘भगोडे’ व ‘पळपुटे’ म्हणाले. त्याचा सूड मतदारांनी घेतला, पण हेच राहुल गांधी आता पराभवानंतर जबाबदारी झटकून पलायन करीत आहेत. भगोडे बनले आहेत असा टोला शिवसेनेने राहुल गांधी यांना लगावला आहे.
देशाच्या सर्व संस्थांवर ‘संघा’चा कब्जा करण्याचे स्वप्न साकार झाल्याची वेदना राहुल गांधी यांनी व्यक्त केली. आयएसआयचा कब्जा असण्यापेक्षा संघाचा कब्जा असणे कधीही चांगले आहे. काँग्रेसचे संघटन उभे करणे व लोकांना कामास लावणे याच्या आड तर कोणी आले नव्हते. तसेच राहुल गांधींच्या राजीनाम्याचा व त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांचा आदर केला पाहिजे. काँगेसला एक अध्यक्ष मिळो हीच आमची प्रार्थना असल्याचं सामना संपादकीयमध्ये म्हटलं आहे.
सामना संपादकीयमधील महत्वाचे मुद्दे
- काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप सतत होत असतो. त्या आरोपातून पक्षाला एकदा तरी मुक्ती मिळावी यासाठी राहुल गांधी यांनी हे पाऊल उचलले आहे. राहुल गांधी म्हणजे नेहरू, इंदिराजी किंवा राजीवही नव्हेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याने देशात हलकल्लोळ वगैरे झालाय, लोक रस्त्यावर आलेत असे चित्र नाही, पण काँग्रेस पक्षात मात्र भूकंप झाला आहे
- भूकंपाच्या हादऱ्यातून पडझड होते. काँग्रेस पक्ष आधीच इतका कोसळला आहे की, पडझडीसाठीही तो उरलेला नाही. दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या आणि देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात मोठी कामगिरी बजावलेल्या पक्षाची ही शोकांतिका आहे.
- काँग्रेस पक्षाच्या दारात चिरा-पणती लावायला तरी कुणी उरेल काय? असे आजचे चित्र आहे. काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर राहुल गांधी यांनी नवा अध्यक्ष निवडण्याची जबाबदारी काँग्रेस कार्यकारिणीवर सोपवली आहे, पण काँग्रेसला संजीवनी देऊ शकेल असा एकही नेता दिसत नाही.
- मोतीलाल व्होरा (वय 89) व सुशीलकुमार शिंदे (वय 78) हे दोन जुनेजाणते आहेत. मुकुल वासनीक, ए.के. ऍन्टोनींची नावे सुरू आहेत, पण मृत काँग्रेसला हे जीवदान देऊ शकतील काय? भारतीय जनता पक्ष काँग्रेसच्या कित्येक मैल पुढे जाऊन पोहोचला आहे. 1971 साली काँगेस ज्या स्थानावर होती तिथे आज भाजप आहे.
- मोदी व अमित शहा यांच्या जोडगोळीने सारा देश व्यापला आहे. संघटन, यंत्रणा, सत्ता व आर्थिक ताकद या तुलनेत काँग्रेस भाजपच्या पिछाडीवर आहे.
- दलित आणि मुसलमान तसेच उच्चवर्णीय हा काँग्रेसचा पारंपरिक आधार प्रादेशिक पक्षांनी तोडला आहे. काँग्रेसचे अनेक वतनदार लोकांनी फेकून दिले व दरबारी राजकारण यापुढे चालणार नाही असा स्पष्ट संदेशच या निवडणुकीतून दिला.
- राहुल गांधी यांनी काही विषय लावून धरले, पण पुलवामा हल्ला, सर्जिकल स्ट्राइकच्या वादळात ते विषय वाहून गेले. काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी नाही. त्यांचा सेक्युलरवाद मुसलमानधार्जिणा आहे. उलट भाजप इतका राष्ट्रवाद, हिंदुत्ववाद कुणाच्याच नसांत नाही हा प्रचार लोकांनी स्वीकारला.
- उत्तर हिंदुस्थानात अमेठीसारख्या गांधी कुटुंबाच्या परंपरागत मतदारसंघात राहुल पराभूत झाले. विरोधी पक्षनेतेपदावर हक्क सांगण्याइतकेही खासदार काँग्रेस पक्षाचे निवडून आले नाहीत. ज्या चार राज्यांत काँग्रेसची सरकारे आहेत तिथेही काँग्रेस झोपली हा धक्का मोठा आहे.
- आमची लोकशाही कमजोर पडली आहे. आता सगळ्यात मोठा धोका हा आहे की, जो निवडणूक आयोग देशाचे भवितव्य ठरवत होता तो केवळ एक उपचार उरला आहे.’’ राहुल गांधींची ही खदखद आहे. त्यांनी इतरही बरेच काही लिहिले आहे.