"राणी सईबाई यांचा मुंबईत पुतळा उभारा", विधानसभा अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 10:41 AM2023-11-30T10:41:13+5:302023-11-30T10:42:02+5:30

कुलाबा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात लवकरच राणी सईबाई यांचा पुतळा उभारला जाण्याची शक्यता आहे. 

"Statue of Rani Saibai in Mumbai", Maharashtra Assembly speaker's Rahul Narvekar letter to Chief Minister Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar | "राणी सईबाई यांचा मुंबईत पुतळा उभारा", विधानसभा अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

"राणी सईबाई यांचा मुंबईत पुतळा उभारा", विधानसभा अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

मुंबई : राणी सईबाई नाईक- निंबाळकर भोसले यांचा मुंबईत पुतळा उभारण्याची मागणी श्रीमंत निर्मलादेवी फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आली होती. या मागणीनंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे कुलाबा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात लवकरच राणी सईबाई यांचा पुतळा उभारला जाण्याची शक्यता आहे. 

सईबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी व छत्रपती संभाजी राजेंच्या आई होत्या. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, श्रीमंत सईबाईराजे या महाराष्ट्राचे आद्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रथम पत्नी आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या मातोश्री होत्या. धीरोदत्त राजमाता जिजाबाई यांच्या मायाछत्राखाली श्रीमंत सईबाईराजे यांचे व्यक्तिमत्व अधिकच प्रगल्भ झाल्याचे इतिहास नोंदीवरुन दिसून येते. 

स्वराज्याच्या उभारणीपासून ते स्वराज्याच्या अस्तिवावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या अफजलखानच्या स्वारीपर्यंतच्या हरप्रसंगी त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे स्वत:च्या मरणप्राय आजारपणात सुद्धा धैर्याने उभ्या होत्या. शेवटच्या श्वासपर्यंत त्यांनी राजधर्माचे पालन केले. याची इतिहासकारांनी दखल घेतली आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, श्रीमंत सईबाईराजे यांच्या जीवनकालाचे सामान्यजनांना दर्शन व्हावे, या उद्देशाने त्यांचा पुतळा मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात बसविण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही आपल्यास्तरावर व्हावी, अशी आग्रहाची विनंती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पत्राद्वारे केली आहे.

Web Title: "Statue of Rani Saibai in Mumbai", Maharashtra Assembly speaker's Rahul Narvekar letter to Chief Minister Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.