पद्मश्री परत घ्या, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; कंगना रणौतच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 07:19 AM2021-11-13T07:19:10+5:302021-11-13T07:27:49+5:30
दिल्ली भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनीही कंगनाचा निषेध केला आहे.
मुंबई/नवी दिल्ली : भारताला १९४७ साली भीक मिळाली व स्वातंत्र्य २०१४ साली मिळाले, असे विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, अकाली दल, राष्ट्रीय जनता दल असे सारेच पक्ष उभे ठाकले आहेत. तिचा पद्मश्री पुरस्कार राष्ट्रपतींनी काढून घ्यावा आणि तिच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा, अशी जोरदार मागणी या पक्षांबरोबरच विविध सामाजिक महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी कंगनाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासाठी साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दिल्लीत राहुल गांधी यांनी कंगनाच्या विधानाचा धिक्कार केला आहे. काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी यापुढे कोणालाही असे पुरस्कार देण्याआधी त्यांची मानसिक तपासणी करावी, अशी मागणी करून, कंगनाच्या डोक्यावर परिणाम झाल्याची शंका उपस्थित केली आहे. तसेच पंतप्रधानांनी तिच्या वक्तव्याबाबत आपली भूमिका जाहीर करावी, असे त्यांनी म्हटले आहे.
दिल्ली भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनीही कंगनाचा निषेध केला आहे. मुंबईत काँग्रेसचे नसीम खान म्हणाले की, स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले. कंगनासारख्या बेताल व्यक्तीने स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे. कंगनाच्या या वक्तव्याचा भाजप नेत्याने निषेध केला नाही. त्यामुळे या वक्तव्यामागे केंद्रातील भाजप सरकारचे षडयंत्र असण्याची शक्यता असल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस तारिक अन्वर यांनी केला.
धडा शिकवू
कंगनाने जी गरळ ओकली आहे, त्याबद्दल तिला देशाचा सच्चा नागरिक कधीच माफ करणार नाही. मुंबई काँग्रेस तिला धडा शिकवेल. कंगनाचे वक्तव्य संपूर्ण देशाला लाज आणणारे आहे.
- भाई जगताप, अध्यक्ष, मुंबई कॉंग्रेस
अटक करा
नवाब मलिक म्हणाले की, १८५७ पासून स्वातंत्र्याचे आंदोलन सुरू झाले. लाखो लोकांनी प्राणाहुती दिली. कंगनाने कोट्यवधी भारतीयांचा अपमान केला आहे. त्यामुळे तिला अटक करायला हवी.