देशात राहुलपर्व सुरू झाले असे म्हणता येणार नाही - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 07:31 AM2017-12-18T07:31:42+5:302017-12-18T07:32:33+5:30

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांची बिनविरोध निवड झाली. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाष्य केले आहे.

Uddhav Thackeray comments on congress president Rahul Gandhi | देशात राहुलपर्व सुरू झाले असे म्हणता येणार नाही - उद्धव ठाकरे

देशात राहुलपर्व सुरू झाले असे म्हणता येणार नाही - उद्धव ठाकरे

Next

मुंबई - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांची बिनविरोध निवड झाली. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाष्य केले आहे. काँग्रेस पक्षाचे सूत्रधार म्हणून राहुल गांधी यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. याचा अर्थ देशात राहुलपर्व सुरू झाले असे म्हणता येणार नाही, पण देशातील सगळय़ात जुन्याजाणत्या काँग्रेस पक्षात ‘राहुलराज’ सुरू झाले हे मात्र नक्की. देशात राहुलराज सुरू व्हावे असे स्वप्न यानिमित्ताने काँग्रेसजनांना पडत आहे, पण स्वप्नपूर्तीसाठी करावी लागणारी मेहनत व संघर्ष करण्याची तयारी या मंडळींकडे आहे काय?, असे उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून म्हटले आहे. 

काय आहे आजचे सामना संपादकीय?
काँग्रेस पक्षाचे सूत्रधार म्हणून राहुल गांधी यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. याचा अर्थ देशात राहुलपर्व सुरू झाले असे म्हणता येणार नाही, पण देशातील सगळय़ात जुन्याजाणत्या काँग्रेस पक्षात ‘राहुलराज’ सुरू झाले हे मात्र नक्की. देशात राहुलराज सुरू व्हावे असे स्वप्न यानिमित्ताने काँग्रेसजनांना पडत आहे, पण स्वप्नपूर्तीसाठी करावी लागणारी मेहनत व संघर्ष करण्याची तयारी या मंडळींकडे आहे काय? आजचा काँग्रेस पक्ष मुळापासून उखडला गेला आहे. सर्वच स्तरांवर पडझड आहे. निष्पर्ण आणि वठलेल्या वृक्षासारखी पक्षाची अवस्था झाली आहे. विरोधी पक्ष म्हणूनही काँग्रेसचे स्थान राहिलेले नाही. त्यामुळे राहुल गांधींच्या खांद्यावर शेवटचा श्वास घेत असलेले एक कलेवर आले असून त्यात जान फुंकण्याची जबाबदारी नियतीने त्यांच्यावर टाकली आहे. राहुल गांधींसमोर आव्हानांचा डोंगर आहे व हा डोंगर पार करणे त्यांना जमणार नाही अशी हाकाटी करणाऱ्यांनी थोडा संयम बाळगायला हवा. राहुल गांधी व त्यांच्या काँग्रेस पक्षाशी आमचे तीक्र मतभेद आहेत. हे मतभेद काँग्रेसच्या बेगडी विचारधारेशी आहेत, पण एखाद्या नेत्याने नवे आव्हान स्वीकारले असेल व त्याच्या मनात देशकार्यासाठी काम करण्याची भावना असेल तर त्यास शिव्या देण्याऐवजी शुभेच्छा देणे ही आपली संस्कृती आहे. राहुल गांधींसमोर आव्हाने असणारच, पण आज देशासमोर काय कमी आव्हाने आहेत? राज्यकर्त्या पक्षाने देशासमोरील आव्हानांवर बोलावे. काँग्रेस पक्ष शिखरावर न्यायचा की खड्डय़ात ढकलायचा याचा निर्णय राहुल गांधी यांनाच घेऊ द्या. गुजरात निवडणुकीचा निकाल काय लागायचा तो लागो, पण एका नवीन राहुल गांधींचा उदय झालेला देशाने पाहिला आहे. पडझडीच्या भीतीने भल्याभल्या नेत्यांचे चेहरे गुजरातच्या भूमीवर काळे ठिक्कर पडले असताना निकाल व परिणामांची पर्वा न करता राहुल गांधी मैदानात लढत होते. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांना हाच आत्मविश्वास पुढे घेऊन जाईल. राहुल गांधी हे काहीच करू शकणार नाहीत, या मानिसकतेत एक मोठा अंधश्रद्धाळू वर्ग येथे आहे. देशाच्या जडणघडणीत नेहरू, इंदिरा गांधी किंवा राजीव गांधींचे काहीच योगदान नसल्याचा त्यांचा दावा असतो. खरं म्हणजे आजचे राज्यकर्ते जे खात आहेत व जगत आहेत किंवा देश ज्या मजबूत पायावर उभा आहे त्यात आपल्या राजकीय पूर्वसुरींचेच योगदान आहे. त्याचे विस्मरण म्हणजे अज्ञान व कृतघ्नपणाचा कळस आहे. देश कुणासाठी थांबत नाही, तो चालतच असतो. मागच्या साठ वर्षांत काहीच घडले नाही व फक्त कालच्या तीन वर्षांत देश उभा राहिला हे ज्यांना वाटते ती माणसं आहेत की मूर्ख शिरोमणी? देशाचे स्वातंत्र्यही कालच्या वर्षभरातच मिळाले. दीडशे वर्षांचा लढा झूठ होता, असाही नवा इतिहास कदाचित मांडला जाईल व त्याचीही तयारी आपल्याला ठेवावी लागेल अशा बिकट व भ्रमित राष्ट्रीय अवस्थेत राहुल गांधी यांनी काँग्रेसची सूत्रं स्वीकारली आहेत. त्यांना शुभेच्छा द्यायला काहीच हरकत नाही.

Web Title: Uddhav Thackeray comments on congress president Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.