मोगलांची राजवट फक्त काँग्रेस पक्षातच नव्हे, तर कोणत्याच पक्षात नसावी, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 07:51 AM2017-12-06T07:51:00+5:302017-12-06T11:39:06+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांचे कौतुक करत भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टार्गेट केले आहे.

Uddhav Thackeray on rahul gandhi | मोगलांची राजवट फक्त काँग्रेस पक्षातच नव्हे, तर कोणत्याच पक्षात नसावी, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

मोगलांची राजवट फक्त काँग्रेस पक्षातच नव्हे, तर कोणत्याच पक्षात नसावी, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

Next

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांचे कौतुक करत भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टार्गेट केले आहे. ''राहुलची ताजपोशी म्हणजे औरंगजेबाची राजवट असल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. याचा अर्थ असा की, मोदी हे राहुलला स्पर्धक मानू लागले आहेत व राहुल नेतृत्व करण्यास सक्षम झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या मनात औरंगजेबाच्या राजवटीविषयी भयंकर तिटकारा असेल तर त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आदेश द्यावेत व महाराष्ट्रातील औरंगजेब, अफझल खानाच्या कबरी खणून उद्ध्वस्त कराव्यात'', असे उद्धव ठाकरे म्हणालेत. 

काय आहे आजचे सामना संपादकीय?
राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यातच जमा आहेत.अध्यक्षपदासाठी पक्षांतर्गत निवडणूक वगैरे होत असली तरी हा एक निव्वळ फार्स आहे. पक्षातील सर्वच ज्येष्ठांनी राहुल गांधी यांना आशीर्वाद दिले आहेत. काँग्रेस पक्षात स्वातंत्र्यपूर्व काळापासून नेहरू-गांधी परिवाराचीच सत्ता आहे. मोतीलाल नेहरू ते राहुल गांधी असा हा प्रवास असला तरी काँग्रेसचे वैभवाचे दिवस संपले असून पडका वाडा किंवा उद्ध्वस्त धर्मशाळेसारखी काँग्रेसची अवस्था झाली आहे. त्यामुळे राहुल गांधींसमोर पक्ष सावरण्याचे व त्यात जान फुंकण्याचे मोठे आव्हान उभे आहे.

देशभरातच काँग्रेस संघटनेची अवस्था बिकट आहे व भारतीय जनता पक्षाने बदनामी व राजकीय भुलभुलैयाचे जे काळेकुट्ट धुके निर्माण केले आहे त्या गडद धुक्यांतून त्यांना वाट निर्माण करायची आहे. राहुल गांधी हे मूर्खांचे शिरोमणी आहेत, राजकारणातील ते एक अनपढ व गवार व्यक्ती असल्याचा प्रचार चारेक वर्षांपासून भाजप गोटातून सुरू आहे. त्यास खतपाणी घालण्याचेच काम राहुल गांधी यांनी आपल्या लहरी वर्तणुकीने केले. भारतीय जनता पक्षाचे जे वादळ वगैरे आले आहे असे म्हणतात, प्रत्यक्षात ते सध्या घोंघावणाऱ्या ‘ओखी’ वादळासारखे आहे. दोन-चार बोटी उलट्यापुलट्या होतील, लाटांचे तडाखे दिसतील, अवकाळी पावसामुळे थोडी तारांबळ उडेल, पण हेच हवामान नव्या रोगराईस आमंत्रण देऊन जाईल. ‘ओखी’चे वादळ आले तसे जाईल व तसेच चित्र आज गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत दिसू लागले आहे. 
भाजपसाठी बिनविरोध किंवा एकतर्फी वाटणारी ही निवडणूक पंतप्रधान मोदी यांची दमछाक करताना दिसत आहे. कारण चार वर्षांपूर्वी ‘पप्पू’ ठरवलेल्या राहुल गांधींना गुजरात निवडणुकीने नेते बनवले आहे. ‘मॅन टू वॉच’ या पद्धतीने त्यांच्याकडे नजरा लागल्या आहेत. गुजरातच्या निवडणुकांचे निकाल काय लागायचे ते लागतील. ईव्हीएम मशीन हीच भाजप विजयाची मोठी ताकद असल्याचा संशय उत्तर प्रदेशमधील ताज्या नगरपालिका निवडणूक निकालानंतर बळावत चालला आहे. त्यामुळे शेअर बाजाराप्रमाणे निवडणूक निकालांचे ‘सेटिंग’ होत असावे. तरीही राहुल गांधी यांनी आता आपण ‘पप्पू’ राहिलो नसल्याचे या निवडणुकीत सिद्ध केले आहे व भारतीय जनता पक्षाने हे मोठ्या मनाने स्वीकारायला हवे. राजकारणात विचारांचे शत्रुत्व असू शकते व आम्ही ते मान्य करतो. विचारांचा पराभव करण्यासाठी निवडणुकांचा बाजार भरवला जातो. पण राजकारणात आमच्या विरोधात कोणी बोलू नये व उभे राहू नये असा एक ‘तिकडम’ विचार निर्माण होत आहे तो धक्कादायक आहे. या नव्या काळोख्या वातावरणात राहुल गांधी काँग्रेस पक्षाची सूत्रे हाती घेत आहेत. 
राहुल गांधींची निवड ही घराणेशाही असल्याची टीका भाजपने सुरू केली आहे. राहुल गांधी हे मंदिरात गेले व पूजा केली याचाही भाजपास संताप आला आहे. उलट राहुल गांधी मंदिरात गेले याचे स्वागत करायला हवे होते. राहुलचे मंदिरात जाणे हा एकप्रकारे हिंदुत्ववादाचा विजय आहे व बेगडी निधर्मवादापासून राहुल गांधी काँग्रेसला मवाळ हिंदुत्ववादाकडे नेत असतील तर संघ परिवाराने राहुल गांधींचा रेशीमबागेत सत्कार करायला हवा. मात्र राहुलची ताजपोशी म्हणजे औरंगजेबाची राजवट असल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. याचा अर्थ असा की, मोदी हे राहुलला स्पर्धक मानू लागले आहेत व राहुल नेतृत्व करण्यास सक्षम झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या मनात औरंगजेबाच्या राजवटीविषयी भयंकर तिटकारा असेल तर त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आदेश द्यावेत व महाराष्ट्रातील औरंगजेब, अफझल खानाच्या कबरी खणून उद्ध्वस्त कराव्यात. आज या थडग्यांची तीर्थस्थाने बनली आहेत. ते संस्कृतीच्या विरोधात आहे. मोगल राजवटी म्हणजे क्रौर्याचा अतिरेक होत्या. सत्ता व सिंहासनासाठी मोगल राजे व युवराजांनी आपल्या बापाला, कुटुंबातील वडीलधाऱ्यांना बंदिवान बनवले. त्यांचा आवाज कायमचा दाबला व सिंहासने काबीज केली. मोगलांची राजवट फक्त काँग्रेस पक्षातच नव्हे, तर कोणत्याच पक्षात नसावी. राहुल गांधी काय करणार, याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे!

Web Title: Uddhav Thackeray on rahul gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.