...पण कुणाच्या ताटातही कुणी उगाच डोकावू नये, उद्धव ठाकरे यांचा भाजपाला टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 07:56 AM2018-02-15T07:56:12+5:302018-02-15T07:57:42+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपाला टार्गेट केले आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे कौतुक करत भाजपावर सडकून टीका केली आहे.

Uddhav Thackeray's Comments on karnataka chicken Politics | ...पण कुणाच्या ताटातही कुणी उगाच डोकावू नये, उद्धव ठाकरे यांचा भाजपाला टोला 

...पण कुणाच्या ताटातही कुणी उगाच डोकावू नये, उद्धव ठाकरे यांचा भाजपाला टोला 

Next

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपाला टार्गेट केले आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे कौतुक करत भाजपावर सडकून टीका केली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केल्यानंतर सध्या कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या सभांचा धडका सुरू आहे. यादरम्यान, राहुल गांधी यांनी मांसाहार करुन कनकछाला नरसिंह स्वामी मंदिराचे दर्शन घेतल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. यावरुनच उद्धव ठाकरे यांनी सामनातून भाजपाचा समाचार घेतला आहे.

''राहुल गांधी यांच्यावर  राहुल गांधी गुजरातप्रमाणे कर्नाटकातही दर्गा, मशिदींबरोबरच अनेक मंदिरांना भेटी देत असल्याने भाजपवाले खवळले आहेत. मांसाहार करून राहुल गांधी देवळात गेल्याचा आरोप येडियुरप्पांनी केला आहे. निवडणूक प्रचाराची पातळी किती खाली घसरत आहे याचा हा पुरावाच म्हणावा लागेल'', असे उद्धव यांनी म्हटले आहे.  

‘शाकाहार’ व ‘धर्मप्रेमी’ येडियुरप्पांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात सीमा भागातील मराठी भाषिकांचे रक्त सांडले, डोकी फोडली. हा हिंसाचार व दडपशाही म्हणजे ‘मांसाहार’च होता! पण बोलायचे कोणी? राहुलच्या ताटात काय होते हे त्यांनाच माहीत, पण भाजपच्या पोटात गोळा आला आहे आणि तो मांसाहारी आहे, हे नक्की, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.

काय आहे आजचे सामना संपादकीय?
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये ‘भाजप’ परिवाराची झोप उडवली. आता कर्नाटकातही गुजरातचीच पुनरावृत्ती घडते की काय असे एकंदर चित्र आहे. गुजरातमधील अनेक मंदिरांना राहुल गांधी यांनी भेटी दिल्या. पूजाअर्चा केल्या. भजन-कीर्तनातही ते सहभागी झाले होते. त्यामुळे त्यावेळी भाजपवाल्यांनी राहुल गांधींवर सडकून टीका केली. कारण राहुल गांधींनी हिंदुत्वाचा स्वीकार केला तर आपले कसे व्हायचे ही चिंता त्यांना वाटत असावी. काँग्रेसने Soft Hinduism स्वीकारून भाजपास गुजरातेत कोंडीत पकडले. सध्या कर्नाटकात काँग्रेस आणि भाजपच्या सभांचा धुरळा उडत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यात राहुल गांधी गुजरातप्रमाणे कर्नाटकातही दर्गा, मशिदींबरोबरच अनेक मंदिरांना भेटी देत असल्याने भाजपवाले खवळले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पांना तर भयंकरच संताप आला आहे. मांसाहार करून राहुल गांधी देवळात गेल्याचा आरोप येडियुरप्पांनी केला आहे. निवडणूक दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी राहुल गांधी कोप्पल जिल्हय़ातील कनकछाला नरसिंह स्वामी मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले. दुपारच्या जेवणानंतर राहुल गांधी देवळात गेले. मात्र त्यांनी ‘मांसाहार’ करून दर्शन घेतल्याचा आरोप येडियुरप्पा यांनी केला. काँग्रेसकडून या आरोपाचे खंडन लगेच केले गेले व शुद्ध शाकाहारी सात्विक जेवण त्या दुपारी राहुल गांधी यांनी घेतल्याचे पुरावे वगैरे दिले गेले. निवडणूक प्रचाराची पातळी किती खाली घसरत आहे याचा हा पुरावाच म्हणावा लागेल. कुणाच्याही धार्मिक भावना व श्रद्धांना ठेच लागू नये, पण कुणाच्या ताटातही कुणी उगाच डोकावू नये. प्रत्येक मंदिरांच्या, धर्मस्थळांच्या काही रूढी, परंपरा आहेत. महाराष्ट्रात काही देवतांना ‘मांसाहारी’ नैवेद्याची प्रथा आहे व ती कटाक्षाने पाळली जाते. देव काही कोंबडे-बकरे मागत नाही आणि तूप, पुरणाची पोळी, श्रीखंडही मागत नाही, मात्र निवडणूक प्रचारात असे मुद्दे येणे हे बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे. राहुल गांधी हे ‘मांसाहार’ करून देवळात गेले, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुद्ध शाकाहार करूनच नवाज शरीफ यांच्या भेटीस गेले होते असा सवाल कोणी केला तर त्यावर काय उत्तर आहे? इंदिराजी शाकाहारी होत्या की मांसाहारी या वादात पडण्यापेक्षा त्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले हे महत्त्वाचे. ‘शाकाहार’ व ‘धर्मप्रेमी’ येडियुरप्पांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात सीमा भागातील मराठी भाषिकांचे रक्त सांडले, डोकी फोडली. हा हिंसाचार व दडपशाही म्हणजे ‘मांसाहार’च होता! पण बोलायचे कोणी? राहुलच्या ताटात काय होते हे त्यांनाच माहीत, पण भाजपच्या पोटात गोळा आला आहे आणि तो मांसाहारी आहे, हे नक्की.

Web Title: Uddhav Thackeray's Comments on karnataka chicken Politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.