वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसला 40 जागांची ऑफर, अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 05:33 PM2019-07-03T17:33:29+5:302019-07-03T17:42:03+5:30
वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या 288 जागा लढण्यासाठी सक्षम आहे, असे वंचितच्या वतीने अण्णा राव पाटील आणि गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले आहे
मुंबई - काँग्रेसवंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास उत्सुक असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी काँग्रेसलाच अल्टीमेटम दिला आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वातील वंचित बहुजन आघाडीने काँग्रेससमोरच प्रस्ताव ठेवला आहे. काँग्रेसकडून अजून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. सर्व काही बातम्यांमधून समजतंय. पण काँग्रेसला आम्ही 40 जागा द्यायला तयार आहोत, याबाबतचा निर्णय त्यांनी 10 दिवसांत कळवावा, असेही वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.
वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या 288 जागा लढण्यासाठी सक्षम आहे, असे वंचितच्या वतीने अण्णा राव पाटील आणि गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन निवडणुकी लढविण्यास इच्छुक असल्याच्या बातम्या माध्यमांत आल्या होत्या. तर, काँग्रेस नेतेही काही जागा देऊन वंचितला सोबत घेण्याची तयारी करत होते. मात्र, वंचितनेच काँग्रेससमोर प्रस्ताव ठेवला असून या प्रस्तावरुन दोन्ही पक्षांतील आघाडी अशक्यच असल्याचे दिसत आहे.
वंचिकडून काँग्रेसला 40 जागांची ऑफर देण्यात आली आहे. विशेष म्हणजे आगामी 10 दिवसात याबाबत काँग्रेसने निर्णय घ्याव, अन्यथा आम्ही 288 जागांवर निवडणूक लढवण्यास सक्षम असल्याचेही वंचितकडून सांगण्यात आले आहे. तर, काँग्रेसला कोणत्या 40 जागा हव्यात तेही सांगावं, असेही वंचितने म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजने आघाडीच्या उमेदवारांनी भरगोस मते मिळाली. वंचितला विजय मिळाला नसला तरी, वंचितमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळेच वंचितकडून ही मागणी करण्यात येत असल्याचे दिसून येते. आम्हाला काँग्रेसपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत. त्यामुळे त्यांना किती जागा द्यायच्या ते ठरवण्याचा अधिकार आम्हाला आहे, असं वंचितच्यावतीने अण्णा राव पाटील यांनी सांगितलं.