'सावरकरांबद्दल जे लिहिलंय ते ऐतिहासिक वस्तुस्थितीला धरुनच; मासिक मागे घेणार नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 07:01 PM2020-02-13T19:01:42+5:302020-02-13T19:03:45+5:30
मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्याची पद्धत चुकीची होती, त्याची दखल काँग्रेस सरकारने घेऊन तात्काळ चौकशीचे आदेशही दिलेले आहेत.
मुंबई - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मासिक जनमानसाची शिदोरी मध्ये वि. दा. सावरकर यांच्याबद्दलचा लेख हा ऐतिहासिक वस्तुस्थितीला धरुनच आहे, त्यामुळे शिदोरीचा अंक मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशी भूमिका काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी घेतली आहे.
शिदोरी मासिकातील लेखावर टीका करत अंक मागे घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, त्यावर बोलताना सचिन सावंत बोलत म्हणाले की, महाराष्ट्रातील भाजपाची सत्ता गेल्याच्या दुःखातून फडणवीस व भाजप नेते बोलत असून राजकारणासाठी ते कोणत्याही स्तराला जात असल्याचे वारंवार दिसून आले आहे. शिदोरी मासिकातील अंकात सावरकर यांच्याबद्दलचा लेख हा त्यांचा द्वेष किंवा बदनामी करण्यासाठी नाही. सावरकरांबद्दल काँग्रेसला व्यक्तीद्वेष नाही, त्यांच्या विचारांना विरोध आहे. या लेखात ऐतिहासिक सत्यच मांडलेले आहे, त्यातील एक शब्दही वावगा नाही. वस्तुनिष्ठ माहितीवर आधारीत हा लेख आहे. लोकांचे प्रबोधन व्हावे हाच त्यामागचा हेतू आहे असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मासिक जनमानसाची शिदोरी मध्ये वि. दा. सावरकर यांच्याबद्दलचा लेख हा ऐतिहासिक वस्तुस्थितीला धरुनच आहे, त्यामुळे शिदोरीचा अंक मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही: मा. सचिन सावंतhttps://t.co/TxKKdwAQq4
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) February 13, 2020
तसेच देवेंद्र फडणवीसांना इतिहास माहित नसावा, परंतु आपल्या राजकीय स्वार्थासाठी सतत सावरकरांचा विषय पेटवण्याचा उद्योग फडणवीस करत असून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, त्यात त्यांना यश येणार नाही असा टोला सचिन सावंत यांनी फडणवीसांना लगावला आहे.
त्याचसोबत मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्याची पद्धत चुकीची होती, त्याची दखल काँग्रेस सरकारने घेऊन तात्काळ चौकशीचे आदेशही दिलेले आहेत. परंतु यावरही फडणवीसांनी राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न केलेला आहे. भाजपाला शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकारही नाही. ज्यांच्या पक्षात छिंदम आहे. ज्यांच्या आशीर्वादने दिल्लीच्या भाजप मुख्यालयात छत्रपतींची मोदींशी तुलना करणारे पुस्तक प्रकाशित करण्यात आले, शिवाजी महाराजांच्या नावाने फसवी शेतकरी कर्जमाफी योजना देऊन महाराजांचा अपमान केला, शिवस्मारकातही भाजपाने भ्रष्टाचार केला, अशा भाजपाला शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही असा चिमटा काँग्रेसने भाजपाला काढला आहे.
याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, काँग्रेसनं राष्ट्रपुरुषांच्या अपमानाची मालिका सुरू केलेली आहे. ती अत्यंत निषेधार्ह आहे.शिदोरीतून 8 फेब्रुवारीच्या अंकात पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अतिशय गलिच्छ अशा प्रकारचे लेख लिहिलेले आहेत. ज्या प्रकारे मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसनं सावरकरांवर गलिच्छ लिखाण केलं. महाराष्ट्रातही तशाच प्रकारचं गलिच्छ लिखाण स्वातंत्र्यवीर सावरकरांवर करण्याचं काम होतंय असं सांगत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता.
महत्त्वाच्या बातम्या
सावरकरांबद्दल काँग्रेसनं जे लिहिलंय ते शिवसेनेला मान्य आहे का?; फडणवीसांचा आक्रमक पवित्रा
सरकारी शाळांमधून सावरकरांचे फोटो हटवा, राज्य सरकारचा आदेश
'5 दिवसांचा आठवडा करत आहात पण...'; अजित दादांनी काढला चिमटा
'लंचटाईममध्ये 2-2 तास पाय मोकळे करायला जातात, तेच हे कर्मचारी'
भाजपा प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा चंद्रकांत पाटलांची नियुक्ती, मुंबईचे अध्यक्षही ठरले!
'आप'ने ६२ जागांसह जिंकली दिल्ली, पण भाजपाला ६३ जागांवर आनंदाची किल्ली!