वाचनाची रूची वाढवण्यासाठी पुस्तकांची गाडी दारोदारी; लेट्स रीड इंडिया फाउंडेशन कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 02:08 AM2020-09-10T02:08:25+5:302020-09-10T02:08:31+5:30
वाचन चळवळीचा श्रीगणेशा
मुंबई : समाजामध्ये वाचनाची गोडी वाढावी. वाचनाची रुची वाढावी. गरजूंपर्यंत पुस्तक पोहोचावीत. मुळात पुस्तके का वाचावीत. कोणती पुस्तके वाचावीत. पुस्तके कशी वाचावीत; याची माहिती देण्यासह खेड्यापाड्यातल्या प्रत्येकापर्यंत पुस्तके पोहोचविण्यासाठी लेट्स रीड इंडिया फाउंडेशन कार्यान्वित झाले असून, फाउंडेशनने मुंबई महानगर प्रदेशात (रायगड) वाचन चळवळीचा श्रीगणेशा केला आहे.
लोकांनी प्रामाणिकपणे वाचन करावे हा या चळवळीचा उद्देश असून, समाज माध्यमांवर लेट्स रीड इंडिया फाउंडेशनला तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चळवळीचे श्रेयही फाउंडेशनने वाचकांना दिले असून, मुंबईतही लवकरच पुस्तकांची गाडी दारोदारी दाखल होणार आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून हे फाउंडेशन सुरू करण्याचे नियोजन होते, पण प्रत्यक्षात गेल्या ३ वर्षांपूर्वी हे फाउंडेशन कार्यान्वित झाले. प्रारंभी अभ्यासक्रमाव्यतिरिक्तची पुस्तके गरजू, गरीब मुलांना देण्यात आली.
जानेवारी २०२० मध्ये ट्रस्ट स्थापन झाले; आणि मग समाज माध्यमांवर मोठ्या वेगाने काम सुरू झाले. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी पहिल्या टप्प्याच्या कामास सुरुवात झाली. लोकांनी वाचावे. कारण लोकांनी वाचले तर आपली प्रगती आहे, यावर लेट्स रीड इंडिया फाउंडेशन ठाम आहे. आता संपूर्ण देशभर पुस्तकांची ही चळवळ उभी करण्याचा मानस आहे. सुरुवातीला तीन राज्यांत म्हणजे महाराष्ट्र, गोवा आणि मध्य प्रदेशात ही चळवळ सुरू होणार होती. मात्र कोरोनामुळे सुरुवातीला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात ‘ग्रंथालय आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. आता नवी मुंबईसह लगतच्या प्रदेशात पुस्तकाची गाडी दारोदारी पोहोचविण्याचे काम सुरू आहे. पुढील दोन वर्षांत ही चळवळ पूर्ण राज्यात उभी केली जाणार आहे. आता पहिल्या टप्प्यात समाज माध्यमांवर उपक्रमाची माहिती लोकांपर्यंत पोहोचविली जात आहे.
हे साधेसुधे ग्रंथालय नाही. ही पुस्तकाची गाडी अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त असून यात जीपीएस, लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम, बारकोड सिस्टीम आहे, हे सर्व आपण आपल्या मोबाइल किंवा कॉम्प्युटरवरून वापरू शकतो. लेखक, पुस्तक प्रकाशन संस्थांनाही पुस्तकांची मदत होईल अशा पद्धतीने पुस्तकांची गाडी कार्यान्वित आहे.
पुढील महिन्यात पुस्तकाची दुसरी गाडी आणण्याचा विचार आहे. सध्या एक गाडी ५० किलोमीटरच्या परिसरात फिरत आहे. वाचकांना पुस्तक वाचण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी देण्यात येत आहे. विशेषत: पुस्तक वाचण्यासाठी शुल्क आकारण्यात येत नाही.
1वाचकांना कोणती पुस्तके वाचण्यास आवडतील? याची माहिती विविध माध्यमातून गोळा केली जात आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक, आर्थिक, राजकीय, बालसाहित्य, संतवाङ्मय, कविता, आत्मचरित्र, स्त्रीहक्क आणि समानता, विविध अनुवादित तसेच अनेक अशी वेगवेगळी पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
2आतापर्यंत ५ हजार पुस्तके खरेदी करण्यात आली आहेत. एका गाडीत २ हजार पुस्तके मावत असून, यातील अद्ययावत सॉफ्टवेअर हे मोठ्या प्रमाणात स्केलेबल असून लाखो पुस्तकांचे आदानप्रदान करण्यास आणि गाड्या चालविता येण्यास सक्षम आहे.
3सदर ग्रंथालय हे जगातील अद्ययावत अशा प्रकारात मोडणारे आहे. भविष्यात यूट्युब चॅनलही सुरू करण्यात येणार असून त्याद्वारे तज्ज्ञांतर्फे वाचनाचे धडे दिले जातील.
अनाथ मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गरीब-होतकरू विद्यार्थी, नोकरी-सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणारी तरुण मुले, वाड्यावस्तीवरील मुलांपर्यंत पहिल्यांदा पुस्तके पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ज्यांना खरी गरज आहे, जे पुस्तक विकत घेऊ शकत नसतील किंवा जे पुस्तक आणण्यासाठी बाहेर पडू शकत नसतील किंवा ज्या परिसरांत वाचनालय नसेल त्यांच्यापर्यंत पुस्तक वाचण्यासाठी पोहोचते केले जाणार आहे.