नागपुरात १ कोटी ६७ लाखाचा खते व औषधांचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 10:21 PM2019-07-26T22:21:15+5:302019-07-26T22:23:00+5:30
रासायनिक खत आणि जैविक औषध विक्रीचा परवाना संपल्यानंतरही साठा करणाऱ्यांविरुद्ध कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून १ कोटी ६७ लाख ४७ हजार ५७४ रुपयांचा साठा जप्त केला आहे. कृषी विभागाच्या तक्रारीच्या आधारावर एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रासायनिक खत आणि जैविक औषध विक्रीचा परवाना संपल्यानंतरही साठा करणाऱ्यांविरुद्ध कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून १ कोटी ६७ लाख ४७ हजार ५७४ रुपयांचा साठा जप्त केला आहे. कृषी विभागाच्या तक्रारीच्या आधारावर एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार सतीश विलास नरशेट्टीवार, सोनाली सतीश नरशेट्टीवार आणि मंगेश मधुकर कोमावार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. नरशेट्टीवार यांची गजानन फर्टिलायझर प्रा. लिमिटेड नावाने कंपनी आहे. या कंपनीकडे २ जून २०१४ ते १ जून २०१७ पर्यंत खते साठवणूक आणि विक्रीचा परवाना होता. २०१७ मध्ये हा परवाना संपुष्टात आला. मात्र त्यानंतर त्यांच्या परवान्याचे नुतनीकरण करण्यात आले नाही. तरीसुद्धा त्यांनी साठा विकत घेतला असून त्याची साठवणूक केल्याची गुप्त माहिती जिल्हा परिषदेच्या भरारी पथकांना प्राप्त झाली होती. हा साठा एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुटीबोरी एमआयडीसी इंडोरामा गेट क्रमांक २ मध्ये लपवून ठेवण्याचे कृषी विभागाच्या लक्षात आले. या माहितीच्या आधारावर कृषी विभागाने कारवाई केली. या कारवाईमध्ये १ कोटी ६७ लाख ४७ हजार ५७४ रुपयांचा खतांचा आणि जैविक औषधांचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांच्या नेतृत्वात कृषी अधीक्षक मिलिंद शेंडे, जि.प. चे कृषी अधिकारी प्रवीण देशमुख, पंचायत कृषी अधिकारी के.पी. उईके यांच्या उपस्थितीत करण्यात आली.