फॅन्सी नंबरच्या शुल्कातून मिळाले १ कोटी ८९ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:07 AM2021-06-29T04:07:00+5:302021-06-29T04:07:00+5:30
नागपूर : गाडीपेक्षा आपल्या गाडीचा नंबर दुसऱ्यांचे लक्ष कसे वेधून घेईल याकडे बऱ्याच जणांचा कल असतो. लक्ष वेधून घेणारा ...
नागपूर : गाडीपेक्षा आपल्या गाडीचा नंबर दुसऱ्यांचे लक्ष कसे वेधून घेईल याकडे बऱ्याच जणांचा कल असतो. लक्ष वेधून घेणारा आकर्षक (फॅन्सी) नंबर जेवढा आकर्षक तेवढी पत मोठी, असा समज अनेकांचा असतो. यामुळेच २०२० मध्ये कोरोनाचा प्रभाव असतानाही फॅन्सी नंबरच्या शुल्कातून प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहर व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूर मिळून १ कोटी ८९ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा महसूल मिळाला. मात्र, चार लाखांचा फॅन्सी नंबर ‘१’ला मागील पाच वर्षांपासून ग्राहकच नाही.
वाहनांना आकर्षक नंबर देण्याचे ‘फॅड’ नवे नाही. गाडीला ठरावीक नंबर मिळावा, यासाठी आग्रही असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ही बाब प्रादेशिक परिवहन विभागाने आपल्या पथ्यावर पाडून घेत २०१३ मध्ये फॅन्सी नंबरच्या शुल्कात तीन ते चार पट वाढ केली. पूर्वी ‘एक’ हा फॅन्सी नंबर एक लाख रुपयांचा होता तो शहरात चार लाखांचा तर ग्रामीण भागात तीन लाख रुपयांचा झाला. आकर्षक नंबर महागल्याने वाहनधारक याकडे पाठ फिरवतील असा काहींचा समज होता. मात्र तसे झाले नाही. शहर आरटीओ कार्यालयाने मागील वर्षी १०४० फॅन्सी नंबरची विक्री करत ९८ लाख ३९ हजार ५०० रुपयांचा तर, पूर्व आरटीओ कार्यालयाला ११४१ फॅन्सी नंबरमधून ९१ लाख १४ हजार रुपयांचा महसूल मिळाल्याने आकर्षक नंबरचे ‘फॅड’ अजूनही कायम असल्याचे चित्र आहे.
-चार लाखांच्या ‘एक नंबर’ ला ग्राहकाची प्रतीक्षा
पूर्वी ‘१’ नंबर हा लाख रुपयांत मिळायचा. वाहनाची नवीन सिरीज सुरू होताच अनेक वाहनधारक हा नंबर मिळविण्यासाठी प्रयत्न करायचे. मात्र फॅन्सी नंबरांच्या शुल्कात वाढ होताच हा नंबर चार लाखांचा झाला. सध्याच्या स्थितीत मागील वर्षांपासून तिन्ही आरटीओ कार्यालयात या नंबरला ग्राहक मिळालेला नाही, मिळणार की नाही यावर शंकाही उपस्थित केली जात आहे.
-दीड लाखाच्या नंबरलाही ग्राहकाची ना
९, ९९, ७८६, ९९९ आणि ९९९९ या नंबरांची किंमत पूर्वी ५० हजार रुपये होती, नंतर त्यात वाढ करून १ लाख ५० हजार रुपये करण्यात आली. गेल्या आर्थिक वर्षात यातील केवळ तीन नंबरांना ग्राहक मिळाले. विशेष म्हणजे, ५० हजार ते ३ हजार रुपयांपर्यंतचे शुल्क असलेल्या फॅन्सी नंबरला सर्वाधिक ग्राहक मिळाल्याने आरटीओचे उत्पन्न कोटीवर पोहचू शकले.
कार्यालय : फॅन्सी नंबर प्रकरणे : महसूल
शहर आरटीओ : १०४० : ९८,३९,५००
पूर्व आरटीओ : ११४१ : ९१,१४,०००