नागपुरात प्लॉट विक्रीच्या नावावर एक कोटीची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:50 AM2018-01-19T00:50:14+5:302018-01-19T00:51:11+5:30
एका केबल चॅनलच्या संचालकाने प्लॉट विक्रीच्या नावावर एक कोटी रुपयाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अजनी पोलिसांनी आरोपी सचिन जागोराव पाटील (४५) रा. दिनप्रजाहित सोसायटी नरेंद्र नगर याला अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका केबल चॅनलच्या संचालकाने प्लॉट विक्रीच्या नावावर एक कोटी रुपयाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अजनी पोलिसांनी आरोपी सचिन जागोराव पाटील (४५) रा. दिनप्रजाहित सोसायटी नरेंद्र नगर याला अटक केली आहे. शरदचंद्र श्रीपत (६९) रा. सोमलवाडा असे फिर्यादीचे नाव आहे.
पाटील स्वत:ला एका केबल चॅनल्सचा संचालक असल्याचे सांगतो. त्याचा प्रॉपर्टी डीलिंग व डेव्हलपर्सचा व्यवसाय आहे. श्रीपत यांच्या तक्रारीनुसार २०१० मध्ये त्यांची पाटील यांच्याशी ओळख झाली. श्रीपत हे मडगाव पोर्ट ट्रस्ट येथून वरिष्ठ मॅनेजर म्हणून सेवानिवृत्त झाले होते. पाटील याने त्याचे बेलतरोडी येथे ले-आऊट असल्याचे सांगितले होते. माफक दरात प्लॉट विकले जात असल्याचे आमिष त्याने दाखवले. पाटील याने श्रीपत व त्यांच्या दोन नातेवाईकांसह अनेक लोकांसोबत प्लॉट विक्रीचा करार केला. गुंतवणूकदारांकडून रोख व धनदेशाद्वारे ७६ लाख २७ हजार रुपये घेतले. इतर गुंतवणूकदारांकडून २८ लाख २१ हजार रुपये घेतले. श्रीपत व इतर गुंतवणूकदारांनी ठरलेली रक्कम दिल्यानंतर रजिस्ट्री करून देण्याचे आश्वासन दिले होते. पैसे पूर्ण दिल्यामुळे गुंतवणूकदार रजिस्ट्रीसाठी पाटीलवर दबाब टाकत होते. परंतु तो टाळाटाळ करू लागला. अनेक दिवस लोटून रजिस्ट्री होत नसल्याने गुंतवणूकदारांना संशय आला. त्यांनी बेलतरोडी येथे जाऊन जमिनीची पाहणी केली. पाटीलने किमान पावणेदोन एकर जागेवर ले-आऊट बनविले होते. परंतु जमिनीची मालकी दुसºयाच्याच नाववर असल्याचे उघडकीस आले. गुंतवणूकदारांनी याबाबत पाटीलला विचारणा केली.
पोलीस सूत्रानुसार पितळ उघडे पडल्यामुळे पाटील याने गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्याचे आश्वासन देऊन शांत केले. पैसे परत केले जातील, या आश्वासनामुळे त्याने अनेक दिवसांपासून गुंतवणूकदारांना शांत करून ठेवले होते. परंतु तो पैसे परत करीत नसल्याचे लक्षात आल्यावर श्रीपत यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला व पाटीलला अटक केली. प्राथमिक चौकशीत श्रीपत यांच्यासह १५ लोकांनी पाटील याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पाटीलला गुरुवारी न्यायालयासमोर सादर करून पाच दिवसाची कोठडी घेतली आहे.
पॉवर आॅफ अटर्नी बोगस
पाटीलने ज्या जागेवर ले-आऊट बनवून प्लॉटची विक्री केली आहे त्या जमिनीच्या मूळ मालकाला या फसवणुकीबाबत माहीत नव्हते. पाटीलने चार लोकांकडून या जमिनीची पॉवर आॅफ अटर्नी मिळविली होती. ५०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तयार करण्यात आलेल्या या पॉवर आॅफ अटर्नीत चार लोकांचे पत्ते सुद्धा नोंदविलेले नाहीत. त्यामुळे ते बोगस असल्याचे आढळून आले आहे.