२४ तासांत १ फुल्ल, ३ हाफ मर्डर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:08 AM2021-01-23T04:08:44+5:302021-01-23T04:08:44+5:30
- पारडीत ऑटोचालकावर खुनी हल्ला - कळमन्यात युवकावर हल्ला लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - उपराजधानीत गेल्या २४ तासांत एकाची ...
- पारडीत ऑटोचालकावर खुनी हल्ला - कळमन्यात युवकावर हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - उपराजधानीत गेल्या २४ तासांत एकाची हत्या झाली, तर तिघांच्या हत्येचा प्रयत्न झाला. पाचपावली, पारडी आणि कळमना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत या घटना घडल्या.
पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशोक श्रीपत मेश्राम (५५) नामक व्यक्तीची त्याच्या पुतण्याने लाकडी दांडक्याने मारून हत्या केली. घरगुती वादातून ही घटना घडली. सारंग युवराज मेश्राम (३३) असे आरोपीचे नाव आहे.
अशोक मेश्राम पंचशील वाचनालयाजवळ राहत होता. तो चिकनच्या दुकानात काम करायचा आणि त्याला दारूचे भारी व्यसन होते. त्यामुळे पत्नी दोन वर्षांपूर्वीच त्याला सोडून गेली होती. त्यामुळे बाजूला राहणाऱ्या युवराज नामक भावाच्या घरी तो अधूनमधून जेवत होता आणि युवराजच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून धाकातही ठेवत होता. त्याने अलीकडे भावाच्या घराला खेटून घराचे बांधकाम सुरू केल्याने पुतण्या सारंगसोबत त्याचा वाद सुरू होता. गुरुवारी सकाळी बांधकाम सुरू होताच सारंगने जागेचा वाद उकरून काढला आणि बांधकामास मनाई केली. यावेळी अशोकने पुतण्याला शिवीगाळ करून त्याचा विरोध मोडून काढला. त्याची खुन्नस मनात ठेवून सारंग दिवसभर संधी शोधत होता. नेहमीप्रमाणे रात्री दारूच्या नशेत टून्न होऊन अशोक मेश्राम घरी आला आणि सारंगला शिवीगाळ करत झोपी गेला. मध्यरात्री दारूच्या नशेत सारंग लाकडी दांडा घेऊन अशोकच्या घरात शिरला आणि अर्धवट झोपेत असलेल्या अशोकच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने फटके हाणून हत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती कळताच पाचपावलीचे ठाणेदार किशोर नगराळे, पोलीस उपायुक्त लोहित मतानी ताफ्यासह तिकडे धावले. त्यांनी आरोपी सारंगला अटक केली.
जीवाच्या भीतीने केली हत्या
गवंडीकाम करणाऱ्या सारंगला पोलिसांनी हत्येचे कारण विचारले असता, त्याने जीवाच्या भीतीने काकाची हत्या केल्याचे सांगितले. अशोक मेश्राम काहीसा गुन्हेगारी वृत्तीचा होता. २०१२ मध्ये त्याने त्याचा भाऊ आणि सारंगचे वडील युवराज मेश्राम यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला होता. गुरुवारी सकाळी वाद झाल्यानंतर अशोकने सारंगला धमकी दिली होती. त्यामुळे तो आपल्या जीवाला धोका पोहोचवेल, ही भीती वाटल्याने त्याची हत्या केल्याचे सारंगने पोलिसांना सांगितले आहे.
ऑटोचालकावर खुनी हल्ला
नागपूर - पारडीतील ऑटोचालकांमध्ये सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान एकावरील प्राणघातक हल्ल्यात झाले. जितू निमजे (वय २७) नामक आरोपीने शेख साबीर शेख रफिक (वय २४) ऑटोरिक्षाचालकावर चाकूचे घाव घालून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. आरोपी जितू पारडीत आणि साबीर गाैरीनगरात राहतो. ते दोघेही पारडी ते गणेशपेठ बसस्थानक मार्गावर ऑटो चालवितात. त्यांच्यात ऑटोत प्रवासी बसविण्याच्या मुद्दयावरून नेहमीच वाद होतात. गणेशपेठ बसस्थानक परिसरात पुन्हा आज वाद झाला. त्यानंतर हे दोघे पारडी थांब्यावर पोहोचले.
शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास जितूने संधी साधून साबीरच्या गळ्यावर चाकूने वार केला. ते पाहून बाजूचे ऑटोचालक धावले. त्यांनी साबीरला मेयोत पोहोचविले. जितूची धुलाई केली. त्याने कसाबसा तेथून पळ काढला. दरम्यान, माहिती कळताच पारडी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून सायंकाळी त्याला ताब्यात घेतले.
अल्पवयीन मुलावर प्राणघातक हल्ला
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलमोहरनगरात राहणारा हर्षल धुंदराज कनोजे (१६) हा आपल्या मित्रासह गुरुवारी सकाळी कामावर जात असताना, १०.३० च्या सुमारास आरोपी कृष्णा बलदेव शाहू (५५) याने हर्षलला अश्लील शिवीगाळ केली. विरोध केला असता आरोपीने विळ्याने मारून हर्षलला गंभीर जखमी केले. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. त्यांनी हर्षलला आरोपी शाहूच्या तावडीतून सोडवले. हर्षलने दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल केला.