नागपूर जिल्ह्यात चार वर्षात बालकांचे हजारावर मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:19 AM2019-04-15T11:19:06+5:302019-04-15T11:20:56+5:30
नागपूर जिल्ह्यात गेल्या ४ वर्षात १ हजार २ बालकांचा मृत्यू झाला आहे. ४२३ अर्भकांचे मृत्यू, १५९ बालमृत्यू व ४२० उपजत मृत्यूचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात गेल्या ४ वर्षात १ हजार २ बालकांचा मृत्यू झाला आहे. ४२३ अर्भकांचे मृत्यू, १५९ बालमृत्यू व ४२० उपजत मृत्यूचा समावेश आहे. त्याचबरोबर जन्मापेक्षा मृत्यूचा आकडा जास्त असल्याचे माहितीच्या अधिकारातून समोर आले आहे.
जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून सांभाळली जाते. जिल्ह्यात ४९ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३१६ उपकेंद्र, ३३ आयुर्वेदिक दवाखाने व २५अॅलोपॅथी दवाखाने आहेत. या यंत्रणेच्या माध्यमातून ग्रामीण नागरिक तथा रुग्णांना आरोग्य सेवा पुरविली जात आहे. जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभागाने नोंदविलेली बालमृत्यूची आकडेवारी धक्कादायक आहे. माता व बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे. जिल्ह्यातील जन्मदर, मृत्यूदर याची माहिती अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात मिळविली आहे.
मुलींचा जन्मदर कमीच!
४ वर्षांत एकूण २२ हजार १७३ मुलामुलींनी जन्म घेतला. २२१७३ पैकी ११६०६ मुले, तर १०५६७ मुलींचा समावेश आहे. मुलांच्या तुलनेत मुली तब्बल १ हजार ३९ ने कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. त्याचबरोबर जन्मदरापेक्षा मृत्यूदर जास्त असल्याचे दिसून येत आहे. ४ वर्षांत एकूण ३१ हजार ८३७ नागरिकांचा मृत्यू झाला.