रेल्वेतून १ किलो १७० ग्रम सोन्याच्या दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2022 11:18 AM2022-04-02T11:18:42+5:302022-04-02T11:20:01+5:30

रात्री झोपताना त्याने बॅग आपल्या डोक्याखाली ठेवली होती. सकाळी जाग आल्यानंतर कर्मचाऱ्याला बॅगेतून दागिने चोरी झाल्याची माहिती पडली. त्याच्यानुसार ही घटना भुसावळ ते वर्धा दरम्यान घडल्याची शक्यता आहे.

1 kg 170 gm gold jewelery theft from the train | रेल्वेतून १ किलो १७० ग्रम सोन्याच्या दागिन्यांची चोरी

रेल्वेतून १ किलो १७० ग्रम सोन्याच्या दागिन्यांची चोरी

googlenewsNext
ठळक मुद्देरेल्वे पोलिसांत गुन्हा अजूनही दाखल नाही

नागपूर :रेल्वेने ज्वेलरी घेऊन जात असलेल्या एका ज्वेलर्समधील कर्मचाऱ्याच्या बॅगेतून १ किलो १७० ग्रम सोन्याचे दागिने चोरीला गेले. दागिन्यांची किंमत ६ कोटी ९ लाख ५७ हजार रुपये सांगण्यात येत आहे. रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाने प्राथमिक चौकशी व सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर चोरीची शक्यता वर्तविली आहे. मुंबईतील ज्वेलर्सचे मालक शनिवारी नागपुरात येत आहेत. ते आल्यानंतरच या प्रकरणाला दिशा मिळणार असून, त्यानंतरच रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल होईल, अशी माहिती आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई येथील ज्वेलर्सचा कर्मचारी सात किलो सोन्याचे दागिने घेऊन मुंबई-हावडा मेलने गुरुवारी रायपूरसाठी निघाला होता. या कर्मचाऱ्याने सहा किलो वजनाचे दागिने आपल्या कपड्यात व १ किलो १७० ग्रम वजनाचे दागिने आपल्या बॅगेत ठेवले होते. रात्री झोपताना त्याने बॅग आपल्या डोक्याखाली ठेवली होती. सकाळी जाग आल्यानंतर कर्मचाऱ्याला बॅगेतून दागिने चोरी झाल्याची माहिती पडली. त्याच्यानुसार ही घटना भुसावळ ते वर्धा दरम्यान घडल्याची शक्यता आहे. चोरीची माहिती मिळताच तो नागपूर स्टेशनवर उतरला. त्याने रेल्वे पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी त्या कर्मचाऱ्याची चौकशी केली व दागिन्यांचे कागदपत्रही मागितले.

कर्मचाऱ्याने दस्तावेज दाखविले. खरंच चोरी झाली की कर्मचारी फसवतोय, यावर शनिवारी खुलासा होऊ शकतो. शनिवारी या कर्मचाऱ्याचे मालक नागपुरात येत आहे. त्यांची विचारपूस करण्यात येणार आहे. त्यानंतरच रेल्वे पोलीस गुन्हा दाखल करेल. या प्रकरणात रेल्वे पोलिसांनी बाळगलेल्या मौनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

- सीसीटीव्ही फुटेजमध्ये साळ्याला सोपविली ज्वेलरी

रेल्वे सुरक्षा दलाने सीसीटीव्ही फुटेज शोधल्यावर लक्षात आले की तो कर्मचारी रेल्वेमधून उतरल्यानंतर आठ नंबरच्या प्लॅटफॉर्मवरून पूर्वेकडील द्वाराजवळ आला. येथे त्याने दुचाकीवर आलेल्या एका व्यक्तीला बॅग दिली, त्यानंतर रेल्वे पोलीस ठाण्यात आला. त्यामुळे कर्मचाऱ्यावर संशय वाढला आहे. रेल्वे पोलिसांनी त्याची चौकशी केल्यावर त्याने सांगितले की, ट्रेनमध्ये चोरी झाली होती व उर्वरित दागिने त्याच्याजवळ आहे. त्यामुळे त्याने हिंदुस्थान कॉलनी येथील राहणाऱ्या साळ्याला रेल्वे स्टेशनवर बोलाविले व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याच्याजवळ दागिने दिले. ही बाबदेखील ज्वेलर्सचा मालक नागपुरात आल्यानंतरच स्पष्ट होईल.

Web Title: 1 kg 170 gm gold jewelery theft from the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.