नागपूर जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांचे होणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 09:32 PM2021-12-31T21:32:38+5:302021-12-31T21:33:09+5:30
Nagpur News कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता, नागपूर जिल्ह्यातील १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना लस देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
नागपूर : संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरणार, असे संकेत असल्यामुळे केंद्र सरकारने ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात या वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ३२ हजार ८३२ असून, शाळाबाह्य विद्यार्थी पकडून ही संख्या दीड लाखावर जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून आरोग्य विभागाकडे उपलब्ध आकडेवारीनुसार, शाळांमध्ये इयत्ता ९ ते १२ वीत शिकणारे १५ ते १८ वयोगटातील १ लाख ३२ हजार ८३२ विद्यार्थी आहेत. तसेच सुमारे १८ हजार मुले शाळाबाह्य असल्यामुळे दीड लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली. तिसऱ्या लाटेची संभावना लक्षात घेता, या वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करणे आवश्यक आहे.
लसीकरणासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक शाळांसह कनिष्ठ विद्यालय व महाविद्यालयांमध्येच विद्यार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे काळजीवाहक म्हणून तेथील शिक्षकांवर जबाबदारी देण्यात येणार आहे. याशिवाय ज्या लोकांनी पहिला व दुसरा डोस घेतला नाही त्यांचेही लसीकरण सुरूच राहणार असून, ६० वर्षांपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस देण्यासंदर्भात नियोजन करण्यात येत असल्याचेही डॉ. सेलोकर यांनी सांगितले. याशिवाय दैनंदिन रुग्णसंख्येतील वाढ लक्षात घेता, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चाचण्यांची संख्याही वाढविण्याचे संकेत डॉ. सेलोकर यांनी दिले आहेत.