राज्यात ऑनलाईन गेमिंगमुळे १ हत्या तर सात आत्महत्या
By योगेश पांडे | Updated: December 12, 2023 17:21 IST2023-12-12T17:20:46+5:302023-12-12T17:21:13+5:30
राज्य शासनानेच ही माहिती विधानपरिषदेत दिली आहे.

राज्यात ऑनलाईन गेमिंगमुळे १ हत्या तर सात आत्महत्या
नागपूर : राज्यातील अनेक तरुण ऑनलाईन गेमिंगच्या विळख्यात सापडले असून त्यामुळे कोट्यवधी रुपयेदेखील गमावले आहे. या गेमिंगच्या नादात राज्यात आतापर्यंत एकाची हत्या झाली असून पैसे हरल्याने तणावात आलेल्या सात जणांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. राज्य शासनानेच ही माहिती विधानपरिषदेत दिली आहे.
मनिषा कायंदे यांनी ऑनलाईन गेमसंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याच्या लेखी उत्तरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून अनेक तरुणांना अक्षरश: त्याचे व्यसन लागले आहे. यात सतत पैसे हरल्याने चंद्रपूरमध्ये एकाची हत्या झाली. तर त्याच जिल्ह्यात एकाने आत्महत्यादेखील केली. याशिवाय ठाण्यात दोन, रायगडमध्ये एक, नाशिक ग्रामीणमध्ये दोन व गोंदियात एक आत्महत्या नोंदविण्यात आली. २०२१ ते २०२३ या कालावधीत राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत ऑनलाईन गेमिंग बाबत ४१ गुन्हे नोंदविण्यात आले. यातील सर्वाधिक १९ गुन्हे नाशिक शहर, १५ गुन्हे नाशिक ग्रामीण, ठाण्यात पाच तर जळगाव, नवीन मुंबईत प्रत्येकी एक गुन्हा नोंदविण्यात आला, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.