आयुष्यात ब्रेन ट्यूमर होण्याची १ टक्का शक्यता
By सुमेध वाघमार | Published: June 7, 2024 05:53 PM2024-06-07T17:53:16+5:302024-06-07T17:53:54+5:30
मेंदू शल्यचिकित्सक : ट्यूमर होण्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक
सुमेध वाघमारे
नागपूर : ब्रेन ट्यूमरमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या दरवर्षी वाढत आहे. अगदी एक वषार्पासून कोणत्याही वयोगटात ब्रेन ट्यूमर होऊ शकतो. लोकांना त्यांच्या आयुष्यात ब्रेन ट्यूमर होण्याची शक्यता १ टक्का असते. मात्र, वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे यावर मात करणे शक्य झाले आहे. त्यामुळे चिंता न करता वेळीच उपचार घेण्याचा सल्ला, मेंदू शल्यचिकित्सक विशेषज्ञानी दिला आहे.
जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस दरवर्षी ८ जून रोजी पाळला जातो. या आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लोकांना शिक्षित करण्यासाठी या दिवसाला महत्त्व आले आहे.
आयोनायझिंग रेडिएशनमुळे वाढते ब्रेन ट्यूमरची जोखीम
मेंदू शल्यचिकित्स विशेषज्ञ डॉ. राहूल झामड म्हणाले, ब्रेन ट्यूमर विकसित होणाऱ्या जोखीम घटकांमध्ये ‘आयोनायझिंग रेडिएशन’च्या संपर्कात येणे आणि मेंदूच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास समाविष्ट आहे. शस्त्रक्रियेनंतर या रूग्णांना पुनर्वसन आवश्यक असते. हा एकूणच उपचाराचा एक महत्त्वाचा भाग आहे.
ट्यूमरची लक्षणे त्याच्या आकारावर अवलंबून
बहुतेक वेळा ब्रेन ट्यूमरची लक्षणे आणि चिन्हे शरीरातील ट्यूमरच्या आकारावर आणि ट्यूमर शरीरात कोठे आहे यावर अवलंबून असतात. काही ट्यूमर थेट मेंदूच्या ऊतींवर परिणाम करतात तर काही मेंदूच्या आसपासच्या भागांवर दबाव टाकत असल्याचे डॉ. झामड यांनी सांगितले.
महिलांनी अधिक जागरूक असणे गरजेचे
प्राथमिक ब्रेन ट्यूमर होण्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये १६ टक्क्यांनी अधिक असते. महिलांनी अधिक जागरूक असणे गरजेचे आहे. ट्यूमरच्या सर्व प्रकरणांपैकी सुमारे ४ टक्के प्रकरणे ० ते १४ वयोगटातील मुलांमध्ये आढळतात. सर्व ब्रेन ट्यूमरपैकी सुमारे ७१ टक्के ट्यूमर सौम्य असतात.
ब्रेन ट्यूमरची लक्षणे
: डोके दुखणे
:उलटी आणि मळमळ
: चालताना तोल जाणे
: झटके येणे
: पॅरालिसीससारखे वाटणे
: बोलण्यात अडचण येणे
: स्वभावात बदल होणे
: दृष्टीवर परिणाम अचानक कमी ऐकू येणे