बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या १० आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 02:27 PM2021-12-05T14:27:49+5:302021-12-05T14:45:48+5:30
सालेकसा कनिष्ठ महाविद्यालय परिसरात बिबट्याची कातडी विकण्यासाठी आलेल्या १० जणांना वनविभागाच्या विषेश पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले.
नागपूर : सालेकसा येथील कनिष्ठ महाविद्यालय परिसरात बिबट्याची कातडी विकण्यासाठी आलेल्या १० जणांना वनविभागाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बिबट्याच्या कातडीसहसह इतर अवयव जप्त केले आहेत.
सविस्तर माहितीनुसार, शनिवारी सालेकसा येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाच्या मैदानावर बिबट्याच्या कातडीची विक्री होत असल्याची माहिती नागपूर वनविभागास प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे विशेष पथकाला गोंदिया येथे रवाना करुन गोंदिया वनविभागाच्या पथकासह सालेकसा परीसरात सापळा रचून १० जणांना ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत आरोपींकडून बिबट्याची कातडी, ४ पंजे, दात, मिशा व ३ मोटार सायकल इत्यादी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या बिबट्याला कोसमतर्राच्या जंगलात माहे-जुलै २०२१ मध्ये शिकार करून त्याचे अवयव काढण्यात आले व त्यानंतर विक्री करण्याकरता बाहेर काढले, असल्याचे आरोपींनी चौकशी दरम्यान सांगितले.
१) राधेश्याम जोहार उईके, रा.जल्लाटोला, २) जोगेश्वर सुप्रीदास दसेरीया, रा. धनसोवा वोरी, ३) पप्पू जोहारलाल मडावी, रा. जांभळी, ४) दिनेश प्रभुदयाल श्रीवास्तव, रा. भंडारा, ५) संदिप चोखा रामटेके, रा.मोकारा, ६) दिनेश ताराचंद सहारे, रा.देवरी, ७) विनोद सुखदेव दशरीया, रा. कावरावांध ८) लितेश कृष्णकुमार कुंभरे, रा. वाघनदी (छत्तीसगढ़), ९) परसराम राया मेश्राम, रा. गिरोला व १०) रामकृष्ण छोटेलाल डहाले, रा. पांढरी अशी आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ च्या विविध कलमान्वये वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर, पुढील तपास प्रदिप पाटिल, सहाय्यक वनसंरक्षक, गादिया हे करीत आहेत.