मालमत्ता कर ३० जूनपूर्वी भरल्यास १० टक्के सूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:09 AM2021-06-16T04:09:21+5:302021-06-16T04:09:21+5:30
आधी टॅक्स भरणाराऱ्यांनाही मिळणार लाभ : अर्ज केल्यास जमा केलेली रक्कम परत लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या ...
आधी टॅक्स भरणाराऱ्यांनाही मिळणार लाभ : अर्ज केल्यास जमा केलेली रक्कम परत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. अशा संकटाचा काळ असूनही कर संकलन गेल्या वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत ११२ टक्के अधिक आहे. नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात मालमत्ता करावर १० टक्के सूट देण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे
१ एप्रिल ते १४ जून कालावधीत मालमत्ता करातून मनपा तिजोरीत १९.५० कोटीचा महसूल जमा झाला आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीत फक्त ९. २२ कोटी रुपये कर वसुली झाली होती. यावर्षी ३० जूनपूर्वी मालमत्ता कर भरणाऱ्यांना शासकीय कर वगळून उर्वरित करामध्ये १० टक्के सूट दिली जात आहे. स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात या योजनेचा समावेश करण्यात आला होता. याची अंमलबजावणी ७ जूनपासून सुरू झाली आहे; परंतु ज्या मालमत्ताधारकांनी आधीच कर भरला आहे. त्यांनाही या सवलतीचा लाभ मिळणार आहे. जमा केलेली जादाची रक्कम परत हवी असल्यास मालमत्ताधारकांना यासाठी अर्ज करावा लागेल. तर जे याची मागणी करणार नाही, त्यांच्या पुढील वर्षाच्या करात या रकमेचे समायोजन करणार असल्याची माहिती प्रकाश भोयर यांनी दिली.
आतापर्यंत ज्या मालमत्ताधारकांनी टॅक्स भरला आहे. त्यात ९ हजार थकबाकीदार आहेत. तर २९ हजार लोकांनी चालू वर्षाचा टॅक्स जमा केला आहे. मालमत्ताकराची ६७८ कोटींची थकबाकी आहे. मागील वर्षात मालमत्ता करातून मनपा तिजोरीत २३६ कोटींचा महसूल जमा झाला.
......
असा मिळणार लाभ!
एखाद्या व्यक्तीला पुढील वर्षातील डिमांड मिळाली नसेल, तर ते आपल्या जुन्या बिलाच्या आधारावर कर संकलन केंद्रावर चालू वर्षाच्या टॅक्सची माहिती करून तो जमा करू शकतात, अशी माहिती उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम यांनी दिली. एखाद्याला १२ हजार रुपये टॅक्स आला असेल तर यातून शासकीय कर २ हजार वजा करून उर्वरित मनपाच्या १० हजाराच्या टॅक्सवर १० टक्के सवलत दिली जाईल.
...
एप्रिलमध्ये जीएसटी अनुदानाचे ५८ कोटी कमी मिळाले
महापालिकेला दर महिन्याला जीएसटी अनुदान स्वरूपात १०८ कोटी मिळतात. मे व जून महिन्यात निर्धारित अनुदान प्राप्त झाले; परंतु एप्रिल महिन्यात अनुदानाचे फक्त ५० कोटी मिळाले. ५८ कोटी कमी मिळाल्याने मनपाची आर्थिक स्थिती बिघडली आहे. ही रक्कम मिळावी, यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती प्रकाश भोयर यांनी दिली. कंत्राटदारांना गेल्या वर्षात बहुतांश थकबाकी देण्यात आली. त्यामुळे आता मनपा आर्थिक अडचणीत नसल्याचे त्यांनी सांगितले.