भद्रावती ‘टेराकोटा पॉटरी’ केंद्राला १० कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:08 AM2021-01-22T04:08:03+5:302021-01-22T04:08:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ग्रामोद्योग संघातर्फे चालविण्यात येणाऱ्या भद्रावतीच्या ‘टेराकोटा पॉटरी’ केंद्राला उत्कृष्टता आणि संशोधन प्रशिक्षणाचे जागतिक केंद्र ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्रामोद्योग संघातर्फे चालविण्यात येणाऱ्या भद्रावतीच्या ‘टेराकोटा पॉटरी’ केंद्राला उत्कृष्टता आणि संशोधन प्रशिक्षणाचे जागतिक केंद्र बनविण्यात येणार आहे. यासाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म- लघु- मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केली. केंद्राला भेट देऊन त्यांनी तेथील कार्याचा आढावा घेतला.
‘टेकारोटा पॉटरी’ ही १९५६ मध्ये स्थापन झालेली जुनी संस्था आहे. त्यात काळानुरूप बदल होऊ शकले नाहीत. मात्र, या कलेला जिवंत ठेवण्याचे काम ग्रामोद्योग संघाने केले आहे. या कलेचा विकास व्हावा आणि चंद्रपूर- गडचिरोली जिल्ह्यातील तरुण व महिलांना रोजगार मिळावा ही आमची प्राथमिकता आहे. ‘एमएसएमई’च्या ‘स्फूर्ती’ योजनेंतर्गत संस्थेला १ कोटी ८० लाख रुपये मंजूर झाले आहेत. उत्कृष्टता आणि संशोधन व प्रशिक्षण तसेच ‘रेड क्ले पॉटरी’चे जगातील पहिले केंद्र भद्रावतीत सुरू होणार आहे. त्यासाठी केंद्र शासनातर्फे १० कोटी रुपये देण्यात येतील, असे गडकरी यांनी सांगितले. या केंद्रात विविध आकर्षक डिझाईन तयार व्हावेत. तसेच तेथे जे कारागीर प्रशिक्षण घेतील ते आपल्या गावात जाऊन उद्योग सुरू करतील व स्वत:चा रोजगार मिळवतील. या केंद्रामुळे भद्रावतीचे नाव जगाच्या नकाशावर येईल, असेदेखील गडकरी यांनी सांगितले.