१० दिवस १४२ लसीकरण केंद्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:12 AM2021-08-14T04:12:41+5:302021-08-14T04:12:41+5:30
नागपूर : कोरोनाचा संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे असताना, याच्या उलट चित्र शहरातील आहे. मागील ...
नागपूर : कोरोनाचा संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे असताना, याच्या उलट चित्र शहरातील आहे. मागील १० दिवस लसीकरणाचे १४२ केंद्र बंद होते. परंतु कुणीच याला गंभीरतेने घेतले नाही. यामुळे लसीकरणाचा फज्जा उडाल्याचे बोलले जात आहे.
राज्य शासनाकडून कोविशिल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा प्राप्त झाला तरच लसीकरण, असे मे महिन्यापासून सुरू आहे. धक्कादायक म्हणजे, मागील १४ दिवसात केवळ २, ५, ९ व १३ ऑगस्ट रोजीच १८ ते ४५ वयोगटात कोविशिल्डचे लसीकरण झाले. यामुळे १५१ पैकी तब्बल १० दिवस १४२ लसीकरण केंद्र बंद होती. मागील १४ दिवसात फक्त कोव्हॅक्सिन लसीचे लसीकरण झाले. परंतु ही ९ केंद्र असल्याने याचा मोठा परिणाम लसीकरणावर झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- १३ दिवसात ५४ हजार लोकांनी घेतला पहिला डोस
पूर्ण क्षमतेने लसीकरण सुरू होते तेव्हा एकाच दिवसात १५ हजारावर लोकांना पहिला डोस दिला जात होता. परंतु आता ५० हजाराचा आकडा गाठण्यास १३ दिवस लागत आहेत. १३ ऑगस्टपर्यंत ५४ हजार ३४७ लोकांनी पहिला डोस घेतला आहे. तर, याच दिवसात २४ हजार ९६० लोकांनी दुसरा डोस घेतला आहे.
- ऑक्टोबर महिन्यात संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता
ऑक्टोबर महिन्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु १८ वर्षांवरील जवळपास ३५ लाख लोकसंख्या असलेल्या नागपुरात १० लाख ३२ हजार ९६३ लोकांनी पहिला तर केवळ ४ लाख २३ हजार २८३ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. संपूर्ण लसीकरणाचे प्रमाण १२ टक्क्यांवरच आहे. यामुळे धोका वाढला आहे.