नागपुरातील बजाजनगरात १० लाखांची धाडसी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 11:10 PM2018-06-16T23:10:52+5:302018-06-16T23:11:01+5:30
कारखानदाराच्या सदनिकेतून १० लाखांची रोकड चोरट्याने लंपास केली. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीकृष्ण अपार्टमेंटमध्ये ७ ते १४ जूनदरम्यान ही धाडसी घरफोडी घडली. शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कारखानदाराच्या सदनिकेतून १० लाखांची रोकड चोरट्याने लंपास केली. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीकृष्ण अपार्टमेंटमध्ये ७ ते १४ जूनदरम्यान ही धाडसी घरफोडी घडली. शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
डागा लेआऊटमध्ये श्रीकृष्ण अपार्टमेंट आहे. येथे ४०१ क्रमांकाच्या सदनिकेत निशांत विमलकुमार बिरला (वय ३७) राहतात. त्यांचा एमआयडीसीत वॉटर ड्रिंकिंग बॉटलवर लावल्या जाणाऱ्या वेष्टणाचा कारखाना आहे. ७ जूनला सकाळी त्यांचा परिवार त्यांच्या मूळ गावी कोलकाता येथे गेला. तेव्हापासून ते सदनिकेत एकटेच आहेत. सकाळी ९ वाजता कारखान्यात निघून गेल्यानंतर ते रात्री उशिरा घरी पोहोचतात. त्यांनी व्यवसायातून मिळालेली ११ लाखांची रोकड शयनकक्षातील कपाटात ठेवली होती. त्यात काही दोन हजारांच्या, काही ५०० च्या तर उर्वरित १०० च्या नोटांची बंडलं होती. कारखान्यातील कर्मचाºयांना पगार देण्यासाठी त्यांना पैशाची गरज भासल्याने त्यांनी शुक्रवारी शयनकक्षातील कपाट उघडले असता त्यात केवळ १०० च्या नोटांचे बंडल (एक लाख रुपये) दिसले. उर्वरित १० लाखांची रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बजाजनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार ज्ञानेश्वर पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह बिरला यांच्या सदनिकेत जाऊन पाहणी केली. घरातील सर्व साहित्य जैसे थे होते. त्यामुळे कपाटाचे ड्रॉवर चावीने उघडून रक्कम लंपास करण्यात आली होती. त्यामुळे कारखान्यात जाताना बिरला यांच्याकडून घाईगडबडीत चुकून दार उघडे राहिले असावे आणि चोरट्याचे आयते फावले असावे, असा अंदाज आहे.
संपर्कातील व्यक्तीचा संशय
या धाडसी चोरीत बिरला यांच्या संपर्कात असलेल्यांपैकीच कुणाचा तरी सहभाग असावा, असाही संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी बिरला यांच्याकडे नेहमी येणे-जाणे असलेल्या तसेच काम करणाऱ्यांवर नजर रोखली आहे. शुक्रवारपासून काहींची पोलिसांनी चौकशीही केली आहे. या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.