नागपुरात १० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 08:02 PM2018-02-14T20:02:43+5:302018-02-14T20:11:00+5:30
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नागपूर जिल्ह्यात तब्बल १०,२६० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ही प्राथमिक माहिती असून पंचनामे अजूनही सुरूच आहेत. त्यामुळे नुकसानीची आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नागपूर जिल्ह्यात तब्बल १०,२६० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ही प्राथमिक माहिती असून पंचनामे अजूनही सुरूच आहेत. त्यामुळे नुकसानीची आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
चार दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी पाऊस व मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. विदर्भासह नागपूर जिल्हाही यातून सुटला नाही. गारपिटीमुळे काटोल, नरखेड, रामटेक, मौदासह जिल्ह्यातील अनेक गावांना फटका बसला. जवळपास १०,२६० हेक्टरवरील गहू, हरभरा आदि पिकांसह संत्रा,मोसंबी, केळी, आंबा ,आदि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास २७६ गावांमधील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नागपूर जिल्ह्यात ११ तारखेला झालेल्या अवकाळी पावसात केवळ मौदा आणि नागपूर ग्रामीण भागालाच फटका बसला होता. तेव्हा जवळपास २०९५ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले होते. परंतु १२ तारखेला पुन्हा गारपीट झाली. तेव्हा नरखेड, काटोल, रामटेक आदी भागाला चांगलाच फटका बसला जवळपास ८२०० हेक्टरवरील पिकांना नुकसान झाले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली. तेव्हा २४ तासात पंचनामे सादर करून प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कृषी व महसूल विभागाचे अधिकारी बुधवारी सकाळपासूनच फिरत आहेत. पंचनामे करीत आहेत. सायंकाळपर्यंत झालेल्या पाहणीनुसार १० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती होती. त्यामुळे नुकसानीची आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे.