नागपूरनजीकच्या भांडेवाडीत १० लाख मेट्रिक टन कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 10:32 PM2018-05-07T22:32:47+5:302018-05-07T22:33:05+5:30
भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील कचऱ्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. डम्पिंगयार्ड दुसरीकडे हलविण्याची मागणी होत आहे. नागरिनांना होणारा त्रास लक्षात घेता त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याचा महापालिके चा प्रयत्न आहे. यातूनच भांडेवाडीत तब्बल १० लाख मेट्रिक टन कचरा जमा आहे़ या कचऱ्याचे बायो मायनिंग करून त्य़ाची विल्हेवाट लावली जाणार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील कचऱ्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. डम्पिंगयार्ड दुसरीकडे हलविण्याची मागणी होत आहे. नागरिनांना होणारा त्रास लक्षात घेता त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याचा महापालिके चा प्रयत्न आहे. यातूनच भांडेवाडीत तब्बल १० लाख मेट्रिक टन कचरा जमा आहे़ या कचऱ्याचे बायो मायनिंग करून त्य़ाची विल्हेवाट लावली जाणार आहे़
शहरातून दररोज ११०० मेट्रिक टन कचरा गोळा होतो. हा भांडेवाडी येथे जमा केला जातो़ यातील २०० ते ३०० मेट्रिक टन कचऱ्यावर सध्या प्रक्रिया केली जाते. उर्वरित ९०० मेट्रिक टन कचरा तसाच साठविला जातो. भांडेवाडी येथे साचलेला कचरा १० लाख मेट्रिक टन इतका आहे़ जमा असलेल्या या कचऱ्यामुळे आसपास प्रदूषण वाढले आहे़ शिवाय येथे आग लागण्याच्या घटनाही वारंवार घडत आहे़ त्यामुळे जमा असलेल्या कचऱ्याचे बायोमायनिंग केले जाणार आहे़ बायोमायनिंग पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावून ती जागा मोकळी केली जाणार आहे़ या कामासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली होती़ एकूण चार निविदा प्राप्त झाल्या होत्या़ यातून नियमाप्रमाणे तीन निविदांची निवड करण्यात आली़ त्यांना निविदा भरण्यासाठी पात्र ठरविण्यात आले़ तसेच आरएफपी (रिक्वेस्ट फॉर प्रपोझल) घेण्याकरिता कळविण्यात आले़ मात्र झिग्मा ग्लोबल एनव्हॉर्न सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड एकाच निविदाकाराने आरएफपी घेतले़ या कंपनीने बायोमायनिंगच्या कामाकरिता १ हजार २३० रुपये प्रति मेट्रिक टन इतका दर दिला होता़ हा दर अधिक असल्यामुळे मनपातर्फे कंपनीला दर कमी करण्याकरिता पत्र देण्यात आले़ यानंतर कपंनीने १ हजार ४० रुपये प्रति मेट्रिक टन इतक्या दरात काम करण्यास तयारी दर्शविली़
दुसरीकडे दराबाबत विचार करण्यासाठी महापालिकेद्वारे नियुक्त त्रिसदस्यीस समितीने १ हजार १५ रुपये प्रती मेट्रिक टन इतक्या दराची शिफारस केली आहे़ आता दरनिश्चिती व अंतिम निर्णयाकरिता हा प्रस्ताव गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात येणार आहे़