नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून १० लाख रुपये उकळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 08:54 PM2018-05-05T20:54:44+5:302018-05-05T20:54:57+5:30
नोकरीचे आमिष दाखवून १० लाख रुपये उकळणाऱ्या तिघांविरुद्ध इमामवाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नोकरीचे आमिष दाखवून १० लाख रुपये उकळणाऱ्या तिघांविरुद्ध इमामवाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. बशिर रमजान खान (वय ६५) जमीर बशिर खान (वय २९) आणि रेणू ऊर्फ जोया जमिर खान (वय २७) अशी आरोपींची नावे आहेत. हे तिघेही मोठा ताजबाग परिसरात राहतात. बशिर खानला पोलिसांनी अटक केली आहे.
रमाकांत भगवानदास ताम्रकर (वय ५०) इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उंटखाना, ईगल पॅलेसमध्ये राहतात. त्यांनी पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीनुसार, ताम्रकर यांची रेल्वेचे निवृत्त कर्मचारी बशिर खान यांच्यासोबत ओळख होती. त्यातून ते खान परिवारातील सदस्यांच्या संपर्कात आले. ताम्रकर यांना आयुष आणि अमन नामक मुले आहेत. ते बेरोजगार असल्यामुळे या दोघांना चांगली नोकरी मिळावी म्हणून ताम्रकर प्रयत्नरत होते. त्यांनी खान यांच्याकडेही आयुष आणि अमनच्या नोकरीचा विषय काढला होता. या दोघांना रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष बशिर खान, जमीर आणि जोया खान या तिघांनी दाखविले. त्यानंतर १ सप्टेंबर २०१६ ते ६ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत ताम्रकर यांनी आरोपींना १० लाख रुपये दिले. पोलिसांच्या माहितीनुसार, ही रक्कम घेतल्यानंतर आरोपींनी आयुष आणि अमनला नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र दिले. प्रत्यक्षात नोकरी मिळालीच नाही. त्यामुळे ताम्रकर यांनी आपली रक्कम परत मागितली. ती परत न मिळाल्याने प्रकरण इमामवाडा ठाण्यात गेले. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर उपरोक्त तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यातील बशिर खानला अटक करण्यात आली असून, जमीर व जोयाची चौकशी सुरू असल्याचे इमामवाडा पोलिसांनी सांगितले.