वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना आता १० लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 10:27 PM2018-07-09T22:27:46+5:302018-07-09T22:29:15+5:30
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना वनविभागातर्फे देण्यात येणारी ८ लाख रुपयांची मदत वाढवून आता १० लाख रुपये करण्यात आली आहे, अशी घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना वनविभागातर्फे देण्यात येणारी ८ लाख रुपयांची मदत वाढवून आता १० लाख रुपये करण्यात आली आहे, अशी घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, पूर्वी अशा प्रकरणात मृत्य व्यक्तीच्या कुटुंबाला एक लाख रुपये रोख व सात लाख रुपयांचे निश्चित ठेवी बँकेत ठेवून मदत केली जात होती. आता बँकेतील सात लाखांची ठेवी कायम राहील व रोख मदतीत आणखी दोन लाख रुपयांची वाढ केली जाईल. याशिवाय वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत होणाऱ्या जनावरांसाठी देण्यात येणारे २५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य वाढवून ते ४० हजार रुपयांचे देण्यात येईल, असेही मुनगंटीवार यांनी जाहीर केले. मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने अनेक उपाययोजना वनविभागातर्फे करण्यात येत असून प्रामुख्याने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेच्या माध्यमातून यासंदर्भात उपाययोजना करण्यात येत आहे. राज्यातील वृक्षाच्छादन वाढावे यासाठी ३ वर्षात ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला असून यावर्षीच्या पावसाळ्यात १३ कोटी वृक्ष लागवड करण्याची मोहीम जारी आहे. या मिशनमध्ये राजकारण न करता वसुंधरेप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची जाण ठेवून सर्व लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
भुजबळांना टोला
पुरवणी मागण्यांवर बोलताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याची आर्थिक स्थिती खालावली असल्याचे सांगत सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली होती. यावर उत्तर देताना मुनगंटीवार यांनी राज्याचा विकास दर वाढल्याचे सांगत विविध योजनांमध्ये वाढ केल्यामुळे पुरवणी मागण्यांचा निधी वाढल्याचे स्पष्ट केले. व्यक्तीला हॉस्पिटलमधील बेडवर व तुरुंगातील दरीवरच चांगले विचार सुचतात. मला मात्र जेलमध्ये न जाताही चांगला अभ्यास करण्याची सवय आहे, असा टोला त्यांनी भुजबळांना लगावला.