ऑनलाईन फ्रॉडमध्ये १० लाख गमावले, तीन महिन्यांनी परत मिळाले
By योगेश पिंगळे | Published: October 19, 2023 10:21 PM2023-10-19T22:21:44+5:302023-10-19T22:29:01+5:30
अखेर तीन महिन्यांच्या आत महिलेला पूर्ण रक्कम परत मिळाली.
नागपूर : पार्ट टाईम जॉबच्या नादात सायबर गुन्हेगारांच्या ‘टास्क फ्रॉड’च्या जाळ्यात अडकून एका महिलेने १० लाख रुपये गमावले होते. मात्र ‘मनी ट्रेल’ व सीडीआरच्या विश्लेषणाच्या माध्यमातून सायबर पोलिसांना आरोपीचे बॅंक खाते गोठविण्यात यश आले. अखेर तीन महिन्यांच्या आत महिलेला पूर्ण रक्कम परत मिळाली.
भारती नामक महिलेला पार्ट टाईम जॉबबाबत ऑफर आली होती. महिलेने त्याला होकार दिल्यावर प्रोडक्टला लाईक केले तर १०० रुपये मिळतील असे आमिष दाखवत तिला गुन्हेगारांनी टास्कच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर आरोपींनी तिला वेगवेगळे टास्क देत जास्त नफ्याचे आमिष दाखवत रक्कम गुंतवायला लावली. तिने १० लाख रुपये गुंतविले, मात्र तिला परतावा मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने सायबर सेलकडे तक्रार केली होती.
पोलिसांनी तिच्या खात्यातून गेलेले पैसे नेमक्या कोणकोणत्या खात्यांमध्ये गेले व तेथून ते कुठे वळते झाले याचा अभ्यास केला. ‘मनी ट्रेल’सोबतच केवायसीचेदेखील विश्लेषण करून पोलिसांनी आरोपीचे खाते शोधले व ते गोठविण्यात यश मिळविले. त्यानंतर महिलेने रक्कम परत मिळावी यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाच्या आदेशानंतर तिला १० लाख रुपये परत मिळाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमित डोळस, केतकी जगताप, रेखा यादव यांनी ही कारवाई केली.