महारेराकडे विदर्भातील बांधकाम प्रकल्पांच्या नोंदणीत १० टक्के वाढ
By मोरेश्वर मानापुरे | Published: April 28, 2024 09:04 PM2024-04-28T21:04:12+5:302024-04-28T21:07:02+5:30
वर्षभरात राज्यातील एकूण ४,३३२ प्रकल्पांची नोंद : विदर्भात ४३७ तर पुण्यात सर्वाधिक १,१७२ बांधकाम प्रकल्पांची नोंदणी
नागपूर : नागपुरात बांधकाम क्षेत्राचा टप्पा वाढत असून प्रकल्पांची संख्या एक हजारावर गेली आहे. त्याचप्रमाणे महारेराकडे विदर्भातील बांधकाम प्रकल्पांच्या नोंदणीत दरवर्षी १० टक्के वाढ होताना दिसत आहे. त्यामुळेच विदर्भात ४४७ तर एकट्या नागपुरात ३३६ बांधकाम प्रकल्पांची महारेराकडे नोंदणी झाली आहे.
नागपुरात घरांच्या विक्रीसह मोठ्या कंपन्यांच्या बांधकाम प्रकल्पांचे काम सुरू आहे. सध्या नागपुरात ३३६ प्रकल्पांची नोंद झाली असली तरीही याआधी हा आकडा १७० ते २०० च्या आसपास असायचा. पुणेनंतर अन्य जिल्ह्याच्या तुलनेत नागपूरची ही संख्या जास्तच आहे. गेल्यावर्षी पुणेमध्ये १,१७२ प्रकल्पांची नोंदणी झाली. त्यानंतर ठाणे ५९७, मुंबई उपनगरात ५२८, रायगड ४५०, आणि नाशिकमध्ये ३१० बांधकाम प्रकल्पांची महारेराकडे नोंदणी झाली आहे.
अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत नागपूर आघाडीवर
राज्यातील काही जिल्ह्यांच्या तुलनेत नागपूर बांधकाम क्षेत्रात पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, संभाजीनगर, नाशिकहून पुढे आहे. नागपूरच्या आसपास केवळ नाशिक आहे. यावरून नागपूरचे बांधकाम क्षेत्र पुणे आणि मुंबईप्रमाणेच संघटित होताना दिसत आहे.
विदर्भात नागपूर पुढेच
बांधकाम क्षेत्रात नागपूर विदर्भात सर्व जिल्ह्यांमध्ये आघाडीवर आहे. अमरावती, अकोला, वर्धा, वाशिम, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीच्या तुलनेत विकासात पुढेच आहे. अन्य जिल्ह्यात बिल्डरांचे व्यक्तीगत घरांवर लक्ष्य असल्याने बिल्डरांचे प्रकल्प कमी प्रमाणात येत आहेत.
राज्यात वर्षभरात ४,३३२ प्रकल्पांची नोंदणी
महाराष्ट्रात महारेराकडे नोंदणीसाठी १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत ५,४७१ नवीन प्रस्ताव आले होते. यामध्ये ४,३३२ नवीन प्रकल्पांना महारेराने नोंदणी क्रमांक दिला. विदर्भात ४४७, उत्तर महाराष्ट्रात ३४७, नाशिकमध्ये ३१० आणि मराठवाड्यात १४९ प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मिळाला.
मुंबई क्षेत्रात एकूण १,९७६ प्रकल्पांची नोंदणी :
ठाणे ५९७
मुंबई उपनगर ५२८
रायगड ४५०
पालघर २२३
मुंबई शहर ७७
रत्नागिरी ६६
सिंधुदुर्ग ३५
विदर्भात एकूण ४३७ प्रकल्पांची नोंदणी :
नागपूर ३३६
अमरावती ४५
वर्धा २४
चंद्रपूर १२
अकोला ११
वाशिम ०४
भंडारा ०३
बुलढाणा ०१
गडचिरोली ०१
बिल्डरांच्या जाहिरातीमधील अनियमितता शोधून त्यांना शो कॉज नोटीसा देणे, व्हर्च्युअल सुनावणी घेऊन निरसन आणि विदर्भ व मराठवाड्यातील ग्राहकांच्या अडचणी दूर करण्याचे काम आहे. महारेराकडे नागपूरसह विदर्भातील बांधकाम प्रकल्पांची नोंदणी वाढली आहे. नागपूरच्या विकासासोबतच बांधकाम प्रकल्पांची संख्याही वाढेल.
संजय भीमनवार, उपसचिव, महारेरा (विदर्भ व मराठवाडा).
नागपुरात घरांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानुसार प्रकल्पांची संख्याही वाढली आहे. सध्या नागपुरात ५०० चौ.मीटरवरील एक हजाराहून अधिक बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. विकासासोबत दरवर्षी १० टक्के मागणी वाढत आहे. महामेट्रोचे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या पूर्णत्वानंतर नोंदणी संख्या दुप्पट, तिपटीवर जाईल.
प्रशांत सरोदे, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र क्रेडाई मेट्रो.