हिवाळी अधिवेशनाची सोय; १० स्पेशल ट्रेनची मुदत वाढली
By नरेश डोंगरे | Published: November 23, 2023 02:21 PM2023-11-23T14:21:14+5:302023-11-23T15:09:55+5:30
प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन निर्णय : हिवाळी अधिवेशनातील पाहुण्यांची होईल सोय
नागपूर :नागपूर, विदर्भातून मुंबई आणि पुणे मार्गावर धावणाऱ्या १० विशेष रेल्वे गाड्यांचा (स्पेशल ट्रेन) मुदत अवधी आणखी काही दिवस वाढविण्यात आला आहे. मुदत अवधी आणि फेऱ्या वाढविण्यात आलेल्या ट्रेनमध्ये मुंबई सीएसएमटी नागपूर आणि नागपूर पुणे साप्ताहिक स्पेशलचाही समावेश आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी येणाऱ्या मुंबई-पुण्यासह, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील हजारो पाहुण्यांना सोयीचे होणार आहे.
ट्रेन नंबर ०२१३९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर ही विशेष गाडी काही महिन्यांपूर्वी सुुरू करण्यात आली होती. तिची मुदत २० नोव्हेंबरला संपली. ती आता तशीच सुरू ठेवून २८ डिसेंबरपर्यंत धावणार असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. अर्थात तिच्या ११ फेऱ्या वाढल्या आहेत. त्याच प्रमाणे ट्रेन नंबर ०२१४० नागपूर -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्वि-साप्ताहिक या स्पेशल ट्रेनची मुदत २१ नोव्हेंबरला संपली ती आता पुन्हा ११ फेऱ्या जास्तीच्या लावत ३० डिसेंबरपर्यंत धावणार आहे.
या दोन्ही गाड्यांना आतापर्यंत जे थांबे होते, ते तसेच राहिल. शिवाय चाळीसगाव आणि जळगाव या रेल्वेस्थानकावरही या दोन गाड्यांना नवीन निर्णयानुसार थांबे देण्यात आले आहे. ट्रेन नंबर ०२१४४ नागपूर - पुणे साप्ताहिक विशेष गाडीच्या सहा फेऱ्या वाढविण्यात आल्या असून ही गाडी आता २८ डिसेंबरपर्यंत धावणार आहे. त्याचप्रमाणे ट्रेन नंबर ०२१४३ पुणे - नागपूर साप्ताहिक स्पेशलच्याही सहा फेऱ्या वाढविण्यात आल्या असून ती आता २९ डिसेंबरपर्यंत धावणार आहे.
ट्रेन नंबर ०११२७ लोकमान्य टिळक टर्मिनस -बल्हारशाह साप्ताहिक विशेष गाडी आता २८ नोव्हेंबर ऐवजी २६ डिसेंबरपर्यंत तर, ट्रेन नंबर ०११२८ बल्लारशाह लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक स्पेशल २७ डिसेंबरपर्यंत धावणार आहे. अशाच प्रकारे ०१४३९ पुणे - अमरावती ३१ डिसेंबरपर्यंत आणि अमरावती पुणे द्वी साप्ताहिक १ जानेवारी २०२४ पर्यंत धावणार आहे.
६० फेऱ्या वाढल्या
विशेष म्हणजे, सध्या दिवाळीला गेलेली मंडळी आपापल्या गावी परतणे सुरू असल्याने बहुतांश रेल्वेगाड्यांमधील गर्दी दोन आठवड्यांपासून जशीच्या तशी आहे. अशात या सर्व गाड्यांच्या एकूण ६० फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
दुसरे म्हणजे, ७ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार ते २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. अधिवेशनात ठिकठिकाणच्या आणि खास करून मुंबई, पुण्यासह मराठवाड्यातील मंत्री, आमदारांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत नागपुरात येतात. शिवाय राज्यभरातील मोर्चेकरी, आंदोलकही पोहचतात. उपरोक्त गाड्यांचा अवधी वाढल्याने त्या सर्वांना सोयीचे होणार आहे.