१० हजारात कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:08 AM2021-03-19T04:08:10+5:302021-03-19T04:08:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील काही पॅथॉलॉजी लॅब व कोरोना टेस्टींग लॅबमध्ये १० हजार रुपये घेऊन कोरोनाचा निगेटिव्ह ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील काही पॅथॉलॉजी लॅब व कोरोना टेस्टींग लॅबमध्ये १० हजार रुपये घेऊन कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट देण्यात येत आहे. या पॅथॉलॉजी लॅबच्या माध्यमातून विदेशात जाणाऱ्यांना लुटण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत कागदपत्रांसह याविषयीचा खुलासा केला.
शिवणकर म्हणाले की, विदेशात जाण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह नसल्याच्या प्रमाणपत्राची आवश्यकता असते. या लॅब अशाच लोकांना ‘टार्गेट’ बनवत आहेत. त्यांच्याकडून १० हजार रुपये मागितले जात आहेत. ११ मार्च रोजी एका व्यक्ती ज्याला कुठलेही लक्षण नव्हते, तो रामदास पेठेतील एका बायो पॅथमध्ये जातो. त्याला दुबईला जायचे होते. त्याचदिवशी त्याला हैद्राबाद येथेही निघायचे होते. दुसऱ्या दिवशी त्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, तरीही ती व्यक्ती हैद्राबादला पोहोचली होती. रिपोर्ट आल्यानंतर लगेचच लॅबमधून एका कर्मचाऱ्याचा फोन आला. तो म्हणाला, ‘निगेटिव्ह रिपोर्ट पाहिजे असेल तर १० हजार रुपये द्यावे लागतील.’ पैसे दिल्यानंतर त्या व्यक्तीला हैद्राबाद येथे असतानाही निगेटिव्ह रिपोर्ट देण्यात आला. दुबईत पोहोचल्यानंतर त्याची पुन्हा चाचणी झाली, तेथील रिपोर्ट निगेटिव्ह आला. राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप आहे की, कुठल्याही प्रकारचे लक्षण नसतानाही पॉझिटिव्ह दाखवले जात आहे. महापालिकेलाही चुकीची माहिती दिली जात आहे. त्यामुळे अशा लॅबवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. शिवणकर यांनी शहरातील अन्य लॅबकडूनही असा गौरखधंदा केला जात असण्याची शक्यता वर्तवली आहे. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे दक्षिण नागपूर अध्यक्ष विशाल खांडेकर, अशोक काटले व मेहबूब पठाण उपस्थित होते.