पीओपी मूर्तींची विक्री केली तर दहा हजारांचा दंड; कारवाईसाठी झोननिहाय पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2022 12:51 PM2022-08-31T12:51:38+5:302022-08-31T12:53:35+5:30
मनपाला कारवाईसाठी मिळणार फक्त एकच दिवस
नागपूर : गेल्या आठवडाभरापासून गणेश मूर्तींची विक्री सुरू आहे. आज बुधवारी गणरायांचे आगमन होत आहे. या दरम्यान राज्य सरकारने पीओपी मूर्तीसंदर्भात उच्च नयायालयात अस्थायी धोरण सादर केले आहे. त्यानुसार न्यायालयाने पीओपी मूर्तींवर बंदी घातली आाहे. दुसरीकडे मंगळवारी सायंकाळी मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रशासक व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जारी केलेल्या आदेशानुसार पीओपी मूर्तींची विक्री करणाऱ्यांना १० हजार रुपये दंड आकारण्याचे निर्देश जारी केले आहे.
पीओपी मूर्तीं विकणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी झोन कर्मचारी व एनडीएस पथकांवर सोपविण्यात आली आहे. मात्र, कारवाईसाठी एकच दिवस मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सर्वाधिक गणेश मूर्तींची विक्री होणाऱ्या भागात व्यापक स्वरुपात कारवाई केली जाणार आहे. तसेच, अन्य झोन क्षेत्रातही मूर्ती विक्री करणाऱ्यांच्या दुकानांची तपासणी केली जाणार आहे. ज्या दुकानदारांनी मातीची मूर्ती सांगून पोअीपी मूर्तींची विक्री केली आहे. अशा विक्रेत्यांची माहिती मनपा गोळा करणार आहे. यासंदर्भात, भाविकांनी तक्रार केल्यास संबंधित विक्रेत्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप यासंदर्भात स्पष्ट आदेश देण्यात आलेले नाही.
गेल्या वर्षी १,२७,७७६ मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले होते. यात ६,७८५ पीओपी मूर्ती होत्या. त्यानुसार मनपा आयुक्तांनी दोन आठवड्यांपूर्वीच पीओपी मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश जारी केले होते. मात्र, त्यानंतर राज्य सरकारच्या निदेशानुसार यात सवलत देण्यात आली. प्रकरण उच्च न्यायालयात गेले. यावर उच्च न्यायालयाने पीओपी मूर्तीवर बंदी घालण्याचे आदेश दिले. त्यानंतर मनपा प्रशासन सक्रिय झाले व मंगळवारी आदेश जारी केले.
कारवाईसाठी झोननिहाय पथक
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पीओर्पी मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे. बुधवारी सकाळपासून झोननिहाय कारवाई केली जाईल. यासाठी पथक गठित करण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.