राज्यात १० हजार उद्योगांना मिळणार ४०० मेगाव्हॅट सोलर ऊर्जा मोफत, उद्योजकांसाठी सुवर्ण संधी
By मोरेश्वर मानापुरे | Published: May 30, 2024 09:33 PM2024-05-30T21:33:32+5:302024-05-30T21:34:33+5:30
Nagpur News: राज्य सरकारच्या प्रस्तावित मुख्यमंत्री सौर उद्योग उत्थान योजनेत (एमएसयू२वाय) राज्यातील १० हजार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) प्रत्येकी ४०० मेगाव्हॅट सोलर वीज मोफत मिळणार आहे. योजनेची अंमलबजावणी राज्यात लवकरच होणार आहे.
- मोरेश्वर मानापुरे
नागपूर - राज्य सरकारच्या प्रस्तावित मुख्यमंत्री सौर उद्योग उत्थान योजनेत (एमएसयू२वाय) राज्यातील १० हजार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) प्रत्येकी ४०० मेगाव्हॅट सोलर वीज मोफत मिळणार आहे. योजनेची अंमलबजावणी राज्यात लवकरच होणार आहे.
या योजनेमुळे उद्योगांची विजेच्या खर्चावर ३० ते ४० टक्के बचत होईल, शिवाय विजेचा दर्जाही उच्च राहील. महाराष्ट्रात सुमारे दहा हजार उद्योगांच्या छतावर प्रत्येकी ४०० मेगाव्हॅट सौर ऊर्जा प्रणाली बसविण्याचे योजनेचे उद्दिष्ट आहे. योजनेत उद्योजकांना काहीही खर्च येणार नाही. महिन्याला ४०० मेगाव्हॅटपेक्षा जास्त विजेचा उपयोग झाल्यास उद्योगाला प्रति युनिट ५ रुपये दराने वीजबिल चुकते करावे लागेल. याअंतर्गत उद्योजकांना फॉर्म भरून द्यायचा आहे. ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आहे.
हिंगणा एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशनने (एमआयए) नागपूर विभागातील उद्योजकांनी वीज बचत आणि वीज बिल कमी करण्यावर लक्ष केंद्रित करून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. याकरिता एमआयएने महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजीच्या (महाप्रीत) सहकार्याने हिंगणा येथील असोसिएशनच्या सभागृहात चर्चासत्राचे आयोजन केले. महाप्रीतचे वरिष्ठ प्रकल्प सहयोगी धनाजी काळे यांनी उद्योजकांना योजनेची माहिती दिली. मंचावर एमआयएचे अध्यक्ष कॅ. सी.एम. रणधीर, कोषाध्यक्ष अरूण लांजेवार उपस्थित होते.
धनाजी काळे म्हणाले, सौर ऊर्जेचा वापर आणि विजेच्या बिलात लक्षणीय बचत करू इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठी योजना फायदेशीर आहे नागपुरातील जास्तीत जास्त उद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अरूण लांजेवार यांनी आभार मानले. या प्रसंगी महाप्रीतचे प्रकल्प व्यवस्थापक यशराज गोरे, शुभम चौधरी, मनोज शिरवळकर, स्वाती झा, एमआयएचे सहसचिव अनंत गुप्ता, सचिन जैन, एस.एम. पटवर्धन, मनीष सावळ, राजकुमार चोखानी, राकेश गुप्ता, कुणाल इटनकर, संदीप फडसे, रमेश पटेल आणि इतर एमआयए सदस्य उपस्थित होते.