१० हजार मेगावॅटचे ‘मेगा’ वीज उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 09:56 PM2019-05-20T21:56:27+5:302019-05-20T21:57:59+5:30
महानिर्मितीने औष्णिक, जल, पवन व सौर ऊर्जेच्या प्रकल्पातून सोमवारी दुपारी १.२८ मिनिटांनी सर्वाधिक १० हजार मेगावॅट वीज उत्पादन केले. ही आजवरचे सर्वोच्च उत्पादन आहे. दरम्यान १.४० मिनिटांनी महानिर्मितीने आपलाच उच्चांक मोडित १० हजार ९८ मेगावॅट वीजनिर्मितीचा नवा उच्चांक गाठला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (कोराडी ): महानिर्मितीने औष्णिक, जल, पवन व सौर ऊर्जेच्या प्रकल्पातून सोमवारी दुपारी १.२८ मिनिटांनी सर्वाधिक १० हजार मेगावॅट वीज उत्पादन केले. ही आजवरचे सर्वोच्च उत्पादन आहे. दरम्यान १.४० मिनिटांनी महानिर्मितीने आपलाच उच्चांक मोडित १० हजार ९८ मेगावॅट वीजनिर्मितीचा नवा उच्चांक गाठला.
तप्त उन्हाळ्यात राज्यातील विजेची मागणी वाढली आहे. सोमवारी (दि.२०) ही मागणी २२ हजार ३०० मेगावॅटवर पोहोचली होती. महानिर्मितीने आपल्या अखत्यारित सर्व औष्णिक, जल, वायू व सौर ऊर्जेवर आधारित संचातून जास्तीत जास्त क्षमतेने विजेचे उत्पादन करून एकूण विजेच्या मागणीत १० हजार ३४ मेगावॅटची मदत केल्याने विजेची मागणी पूर्ण करण्यात मोठी मदत झाली. राज्यातील २२ हजार ३०० मेगावॅटची मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मितीची १० हजार ३४ मेगावॅट, खासगी वीज उत्पादकांकडून ७ हजार ३०७ मेगावॅट तर केंद्र शासनाच्या प्रकल्पातून ५३५७ मेगावॅटची मदत झाली.
महानिर्मितीच्या चंद्रपूर वीज केंद्राने सर्वात जास्त २ हजार ५५० मेगावॅट, कोराडी वीज केंद्राने १५०० मेगावॅट, भुसावळ ९६७, खापरखेडा वीज केंद्राने ९५१ मेगावॅट त्यानंतर नाशिक ५६१ मेगावॅट, पारस ४५० तसेच उरण येथील वायू, जल व सौर वीज केंद्रातून एकूण २१०० मेगावॅट वीज प्राप्त झाली. एकावेळी १० हजार ३४ मेगावॅटची वीजनिर्मिती करून महानिर्मितीने इतिहास रचला आहे. यासाठी दर्जेदार कोळसा, कोळशाचा क्षमतेने वापर, वीजसंचांनी दिलेली साथ, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे परीश्रम उपयोगी पडले. या उल्लेखनीय उत्पादनाने महानिर्मितीचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. महानिर्मितीचे अध्यक्ष (व्यवस्थापकीय संचालक) अरविंद सिंग, संचालक चंद्रकांत थोटवे यांनी सर्व मुख्य अभियंते, अधिकारी, विभागप्रमुख, अभियंते, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
गत ७० वर्षांतील ही ऐतिहासिक नोंद आहे. महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन. त्यांची अहोरात्र मेहनत सार्थकी आली. भविष्यात भुसावळ केंद्रातून ६६० मेगावॅट आणि कोराडी केंद्रातून १३२० मेगावॅट अधिकच्या विजेची निर्मिती केली जाईल. यासोबतच राज्यात १० हजार मेगावॅटचे सोलर प्रकल्प लवकरच कार्यान्वित होतील.
चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जा मंत्री, महाराष्ट्र.