दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या
By Admin | Published: July 11, 2016 02:50 AM2016-07-11T02:50:56+5:302016-07-11T02:50:56+5:30
दहावीत शिकत असलेल्या एका शाळकरी मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केली.
हुडकेश्वर खुर्द येथील घटना : विष प्राशन केले
नागपूर : दहावीत शिकत असलेल्या एका शाळकरी मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केली. शनिवारी ९ जुलैला ही घटना उघडकीस आली. उज्ज्वला राजेंद्र गवळी (वय १५) असे तिचे नाव आहे. ती पिपळा फाटा, हुडकेश्वर खुर्द गावात राहात होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
उज्ज्वला, तिचे वडील आणि भाऊ असे तिघेच जण गवळी कुटुंबात आहेत. तिचे वडील ग्रामपंचायतमध्ये कार्यरत आहेत. मोठा भाऊ राजेश (वय १७) शिक्षणासोबतच खासगी काम करतो. उज्ज्वला भूपेंद्र विद्यालयात दहावीत शिकत होती. ७ जुलैला ती सायंकाळी शाळेतून घरी आली आणि अस्वस्थ वाटत असल्याने झोपली. सायंकाळी ५.३० ला राजेश घरी आला तेव्हा त्याला उज्ज्वला उलटी करताना दिसली. तिच्या तोंडातून फेस येत होता. ते पाहून त्याने शेजाऱ्यांच्या मदतीने उज्ज्वला मेडिकलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना ९ जुलैच्या पहाटे ५.२० वाजता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या प्रकरणाची चौकशी करून हुडकेश्वरचे उपनिरीक्षक संदीप गवई यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. (प्रतिनिधी)
चार वर्षांपूर्वी आईची आत्महत्या
उज्ज्वलाने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली ते स्पष्ट झाले नाही. त्यामुळे परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत्यूपूर्वी तिने चिठ्ठी वगैरेही लिहून ठेवली नाही. चार वर्षांपूर्वी अशाच प्रकारे तिच्या आईने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. तेव्हापासून घरकामाचा भार उज्ज्वलावर आला होता. त्यामुळे ती काहीशी दडपणात राहत होती. याच कारणामुळे तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज निकटवर्तीयांकडून बांधण्यात येत आहे.