नागपुरात डेंग्यूने घेतला १० वर्षीय चिमुकलीचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 10:19 AM2018-09-17T10:19:00+5:302018-09-17T10:20:06+5:30

उपराजधानीत घराघरांमध्ये डेंग्यूसंशयित रुग्ण आढळून येत आहेत. शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या १० वर्षीय चिमुकलीचा बळी गेला तरी या मृत्यूची नोंद शासनदरबारी नाही.

The 10-year-old victim of dengue took to Nagpur | नागपुरात डेंग्यूने घेतला १० वर्षीय चिमुकलीचा बळी

नागपुरात डेंग्यूने घेतला १० वर्षीय चिमुकलीचा बळी

Next
ठळक मुद्देरुग्णांची संख्या १०० वर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत घराघरांमध्ये डेंग्यूसंशयित रुग्ण आढळून येत आहेत. शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आहेत. परंतु प्रशासन डेंग्यूला घेऊन गंभीर नसल्याचे चित्र आहे. मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या १० वर्षीय चिमुकलीचा बळी गेला तरी या मृत्यूची नोंद शासनदरबारी नाही. कमीतकमी आकडेवारी दाखवून प्रशासन काय सिद्ध करू पाहतेय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
एकीकडे सण उत्सवाचे वातावरण असताना दुसरीकडे डेंग्यू गंभीर रूप धारण करीत आहे. डेंग्यूला सर्वाधिक लहान मुले व वृद्ध व्यक्ती बळी पडत आहेत.
बहुतांश लहान मुलांच्या इस्पितळांमध्ये याच आजाराचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महानगरपालिकेचा आरोग्य विभाग या रुग्णाकडे संशयित डेंग्यूचे रुग्ण म्हणून पाहते. त्यांच्याकडील ‘एलायझा टेस्ट’ पॉझिटिव्ह आल्यावरच अशा रुग्णांची नोंद ठेवते. तर खासगी डॉक्टर ‘रॅपिड टेस्ट’सारख्या प्राथमिक चाचणी करून डेंग्यू म्हणूनच उपचार करतात.
परिणामी, अर्धे नागपूर डेंग्यूच्या प्रकोपात असताना मनपाच्या आरोग्य विभागात १०० वर रुग्णांची नोंद आहे तर एकाही मृत्यूची नोंद नाही. काचीपुरा येथील रहिवासी १० वर्षीय वैष्णवी दीपक सोरगे हिचा मृत्यू मेडिकलमध्ये १० सप्टेंबर रोजी झाला. डॉक्टरांनी मृत्यूसाठी डेंग्यू हे कारण लिहिले असतानाही मनपाकडे याची नोंद नाही; असे कितीतरी मृत्यू व रुग्णांची नोंद महापालिका घेत नसल्याचे वास्तव आहे.

चार दिवसांनी मिळतो ‘एलायझा’ चाचणीचा अहवाल
शहरात डेंग्यूच्या रु ग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही रु ग्णांचा मृत्यूही होत असताना महापालिका डेंग्यूचा प्रकोप नसल्याचा दावा करीत आहे. खासगी डॉक्टरांनी डेंग्यूच्या रु ग्णांची माहिती मनपाला देणे बंधनकारक आहे. मात्र याविषयी अनेक खासगी इस्पितळे अद्यापही मौन बाळगून आहेत. मनपाच्या ‘एलायझा’चाचणीचा अहवाल साधारण चार-पाच दिवसानंतर येतो. परिणामी रुग्णांवर तत्काळ उपचाराची दिशा स्पष्ट होत नसल्याचे अनेक डॉक्टरांचे म्हणणे आहे. दुसरीकडे घराघरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून येत असतानाही मनपा कारवाई करीत नसल्याने अशा दूषित घरांची संख्या वाढत आहे.

मनपाकडून डेंग्यू रुग्णांची उपेक्षा
शहराची लोकसंख्या ३० लाखावर गेली असताना महापालिका फक्त तीन रुग्णालयांतून आरोग्य सेवा देत आहे. त्यांच्या मदतीला असे एकूण २९ बाह्यरुग्ण विभाग आहेत, मात्र कुठेच डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार होत नाही. उपचारासाठी रुग्ण आल्यास त्याला थेट मेयो, मेडिकलकडे पाठविले जाते.

Web Title: The 10-year-old victim of dengue took to Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.