एसटी कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 07:00 AM2020-09-04T07:00:00+5:302020-09-04T07:00:07+5:30
२० ऑगस्टपासून एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाली. परंतु गरज नसताना १०० टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
दयानंद पाईकराव
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. २० ऑगस्टपासून एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाली. परंतु गरज नसताना १०० टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
नागपूर शहरात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. दररोज हजारावर रुग्ण आढळत आहेत. शासकीय कार्यालयात कमीत कमी कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्याचे आदेश आहेत. तरीसुद्धा एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात १०० टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्यात येत आहे. नियमानुसार ३० कर्मचारी किंवा ३० टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्याची गरज आहे. परंतु विभाग नियंत्रक कार्यालय तसेच विभागीय कार्यशाळेत १०० टक्के कर्मचारी कामावर येत आहेत. यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यास इतरांना धोका होण्याची शक्यता आहे. याशिवाय गर्भवती महिला तसेच अपंग कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची सक्ती करण्यात येत आहे. अन्यथा त्यांना सुट्या कापण्यासाठी भाग पाडण्यात येत आहे. त्यामुळे गरज नसताना कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्यात येऊ नये, अशी ओरड कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे.
शासनाच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांना बोलवावे
नागपुरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. १०० टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलविल्यास धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांना कामावर बोलवावे.
अजय हट्टेवार, प्रादेशिक सचिव, एस. टी. कामगार संघटना.
आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांना बोलावीत आहोत
एसटी अत्यावश्यक सेवा आहे. एसटी बसेस सुरू झाल्यामुळे आवश्यकतेनुसार कर्मचारी बोलाविण्याची सूचना आहे. चालक-वाहकांना रोटेशननुसार बोलाविण्यात येत आहे. वर्कशॉपमध्ये मोठ्या प्रमाणात कामे वाढली आहेत. त्यामुळे १०० टक्के कर्मचाऱ्यांना बोलाविण्यात येत आहे.
नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग