Coronavirus in Nagpur; नागपुरात केटीनगर येथे मनपाचे १०० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 09:10 AM2021-04-28T09:10:55+5:302021-04-28T09:11:15+5:30
Coronavirus in Nagpur नागपूर महापालिकेच्या केटीनगर रुग्णालयात १०० खाटांच्या कोविड रुग्णालयाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या केटीनगर रुग्णालयात १०० खाटांच्या कोविड रुग्णालयाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. या कोविड सेंटरवर जे पॉझिटिव्ह आणि सौम्य लक्षणे आहेत, त्यांना ॲडमिट करून घेतले जाईल. रुग्णास दाखल करून घेण्याचा निर्णय कोविड सेंटरवरील डॉक्टरांच्या सल्ल्यानेच होईल.
केटीनगर येथे कोविड रुग्णालय सुरू करण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध होता. महापौरांसह आमदार विकास ठाकरे, नगरसेवक हरीश ग्वालबन्शी व विक्रम ग्वालबन्शी यांनी स्थानिक नागरिकांची समजूत घातली. त्यांना रुग्णालय सुरू करण्याची निकड समजवून हे रुग्णालय उघडण्यासाठी तयार केले. रुग्णालयाची इमारत मनपाची आहे. तसेच डॉक्टर्स, नर्सेस व अन्य स्टाफची व्यवस्थासुद्धा मनपामार्फत करण्यात आली आहे. तसेच जेवणाची, औषधी व अन्य सुविधा मनपातर्फे नि:शुल्क करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या संचालनाची व्यवस्था रमेश फुके चॅरिटेबल ट्रस्टकडे देण्यात आली आहे. आमदार डॉ. परिणय फुके व त्यांचे सहकारी संचालनात मदत करतील.
नागपूर येथे कोविड रुग्णांना अधिकाधिक सोयी उपलब्ध व्हाव्यात म्हणून अनेक सामाजिक संस्था आपली सेवा देत आहेत. याचाच भाग म्हणून सामाजिक दृष्टिकोन ठेवत मनपा व फुके यांनी एक चांगले कार्य हाती घेऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व सोयीनेयुक्त अशा मनपाच्या कोविड सेंटरची सेवा रुग्णांनी घ्यावी, असे आवाहन केले. परिणय फुके यांनी ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी नितीन गडकरी यांच्याकडे केली असता पाठपुरावा करून जास्तीत जास्त सिलेंडर उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले.
उपमहापौर मनीषाताई धावडे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य सभापती संजय महाजन, झोन सभापती सुनील हिरणवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, उपायुक्त मिलिंद मेश्राम, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, नगरसेविका माया इवनाते, दर्शनाताई धवड, अमर बागडे, भाजपा ओबीसी आघाडी नागपूर अध्यक्ष रमेश चोपडे, चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रवीण जैन, सहसचिव नितीन फुके, ट्रस्टच्या कोषाध्यक्ष तथा नगरसेविका डॉ. परिणीता फुके, डॉक्टर, परिचारिका उपस्थित होते.